कोल्हापूर • प्रतिनिधी कागलमधील छत्रपती संभाजीराजे यांचा पुतळा पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरेल, असे उद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. लोकवर्गणीतून प्रतिष्ठापना करावयाच्या या पुतळ्याच्या निधी संकलन प्रारंभ कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले, विधायक कार्यासाठी सर्वच राजकीय नेते एकत्र येतात, ही कौतुकास्पद बाब आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने लोकवर्गणीतून हा पुतळा उभारला जाणार आहे. आपली स्वतःची वर्गणी म्हणून मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पाच लाख रुपये निधी पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने वडूज येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मारकासाठी ५०० कोटीचा प्रकल्प तयार केला आहे. छत्रपती संभाजीराजेंचा चुकीचा इतिहास सांगितला जात असताना, त्यांचे खरे जीवनचरित्र समाजापुढे येण्यासाठी प्रयत्न करूया. मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कागल ही छत्रपती शाहू महाराजांची पुण्यभूमी आहे, इथूनच त्यांनी जगाला समतेचा विचार दिला. १९०२ साली प्राथमिक शिक्षण मोफत, सक्तीचे मुलींचे शिक्षण, ३३ टक्के आरक्षण देणारा हा महान राजा होता. स्वत:चा खजिना रिकामा करून राधानगरी धरण बांधणारा हा लोककल्याणकारी राजा होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह बसवेश्वर यांचाही पुतळा शहरात आहे. गैबी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लवकरच लोकार्पण होणार आहे. छत्रपती शाहू महाराजांचा शाहू उद्यानातील पुतळा खर्डेकर चौकात न्यावा व तेथील बॅरिस्टर खर्डेकर यांचा पुतळा एका बाजूला बसवावा, बसस्थानक परिसरातील श्रीमंत बाळ महाराजांचा पुतळा जयसिंगराव पार्कात नेवून त्याठिकाणी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांचा पुतळा बसवावा, श्रमिक किंवा शाहू गृहनिर्माण सोसायटी अथवा ठाकरे चौकामध्ये स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा पुतळा बसावावा, याबाबत त्यांच्या कुटुंबियांना विचारणाही केली आहे. यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, चांगल्या विधायक कार्यासाठी कागलमध्ये सर्वच राजकीय नेते एकत्र येतात, ही कौतुकास्पद बाब आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लोकवर्गणी गोळा करून तो लोकोत्सव साजरा करूया. कारण, हा पुतळा बारा बलुतेदार व अठरापगड जातींचा असणार आहे. सामाजिक कार्यासाठी सगळेजण गट पक्षभेद विसरून एकत्र येऊया. माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक सकल मराठा समाजाचे अध्यक्ष नितीन दिंडे यांनी केले. कागल नगरपालिकेने नगरोत्थान योजनेतून पुतळा चबुतरा बांधकामासाठी ४० लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह नगरपालिका पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास मान्यवर उपस्थित होते. ……….. वहिनीसाहेबांना अभिनंदनाचा निरोप पोहोचवा…. शाहू साखर कारखाना बिनविरोध झाल्याचा संदर्भ देत मंत्री मुश्रीफ म्हणाले, कारखान्याच्या अध्यक्षा झाल्याबद्दल श्रीमंत घाटगे वहिनीसाहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन. माझा हा अभिनंदनाचा निरोप समरजीत घाटगे यांनी वहिनीसाहेबांपर्यंत पोहोचवावा. मी व स्वर्गीय विक्रमसिंहराजे यापूर्वी निवडणुका बिनविरोध करायचो, त्यावेळी समरजितसिंह घाटगे लहान होते. त्यावेळी श्रीमंत वहिनीसाहेबांना स्वीकृत सदस्य घ्या, असे मी स्वर्गीय विक्रमसिंहराजेना सांगायचो. यापुढेही त्या स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार चांगले काम करतील, असेही असेही ते म्हणाले. दरम्यान, आधी भाषण केलेल्या समरजितसिंह घाटगे यांनीही केडीसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ——————————————————- Attachments areaReplyForward