कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी महाविकास आघाडीच्या धोरणानुसार या पोटनिवडणुकीत ही जागा कॉंग्रेसला सोडण्यात आली आहे. महाविकास आघाडी निर्माण करताना अजेंडा तयार करण्यात आला असून, त्या अजेंड्याप्रमाणेच महाविकास आघाडी निर्णय घेण्यास कटिबद्ध असून, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून संपूर्ण ताकतीने पाठीशी रहा आणि कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची विजयी पताका फडकवा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी विधानभवन येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची खेळीमेळीच्या वातावरणात बैठक पार पडली.
बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीधर्मानुसार जागा कॉंग्रेसला देणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले. भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षेस खतपाणी मिळेल असे कोणतेही वर्तन शिवसैनिक करणार नाहीत. भाजपला हद्दपार करण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून मतदान करावे. या निवडणुकीतून भाजपला कायमचे हद्दपार करण्यासाठी शिवसैनिक जोमाने प्रचार करतील आणि शिवसैनिकच महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून देतील, असे सांगितले.
या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख जयवंत हारुगले आदी उपस्थित होते.