आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे: निवडणूक निरीक्षक राजू नारायण स्वामी

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
      कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक कालावधीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, आचारसंहितेचा भंग झाल्याचे आढळून आल्यास ऑनलाईन तक्रार दाखल करावी, अशा सूचना कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचे निवडणूक निरीक्षक राजू नारायण स्वामी यांनी केल्या.
       जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात निवडणूक निरीक्षक श्री. स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवणारे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर, एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक तथा निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी राहुल भिंगारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष कणसे तसेच राजकीय पक्षांचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
       यावेळी निवडणूक निरीक्षक श्री. स्वामी म्हणाले, उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. सर्व उमेदवारांनी निवडणूक कालावधीत विविध बाबींवर करण्यात येत असलेल्या खर्चाची माहिती खर्च व्यवस्थापन कक्षाकडे सादर करावी. निवडणूकी दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास सीव्हिजिल अँपच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार दाखल करावी. कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
       निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर म्हणाले, सर्व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे. निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या परवानग्या वेळेत घ्याव्यात. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतदानाची सोय उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगितले. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, एक खिडकी कक्ष, उमेदवार खर्च मर्यादा, ईव्हीएम मशीन, स्ट्रॉंग रुम, टपाली मतदान आदी विषयांबाबत त्यांनी माहिती दिली.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!