पुणेच्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था प्रशिक्षणार्थींची केडीसीसीला अभ्यास भेट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेतील प्रशिक्षणार्थीनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अभ्यास भेट दिली. “सहकार चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे योगदान” या विषयावर ही अभ्यासभेट होती. या अभ्यास भेटीत नेपाळ कृषी विकास बँकेसह दिल्लीस्थित नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया, तामिळनाडू सहकारी मार्केटिंग संस्था, आंध्र प्रदेशातील तेलंगणा स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक तसेच बेंगलोरमधील नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील व्यवस्थापनामधील अधिकारी सहभागी झाले. 
       या अभ्यासभेटीत वैकुंठ मेहता संस्थेच्या ‘सहकार आणि उद्योग’ या विषयाच्या पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमाच्या नेपाळसह दिल्ली, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा येथील २६ प्रशिक्षणार्थीचा समावेश होता.
       बँकेच्यावतीने संचालक भैय्या माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी प्रशिक्षणार्थी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
        बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी बँकेच्या कामकाजाविषयी विभागनिहाय सविस्तर माहिती दिली. तसेच सहकाराच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात असलेल्या बँकेच्या योगदानाविषयी सविस्तर विवेचन केले.
        वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार प्रशिक्षण संस्थेचे प्रकल्प संचालक डॉ. एस. वाय. देशपांडे म्हणाले, २००० साली एटीएम सुरू करणारी केडीसीसी ही देशातील पहिली जिल्हा सहकारी बँक आहे. त्यापाठोपाठ एटीएम, सीईआरएम, मायक्रो एटीएम सेवा, मोबाईल बँकिंग, मोबाईल व्हॅन, स्वतःचे डाटा सेंटर, स्वतःचे सॉफ्टवेअर  ही वाटचाल क्रांतिकारक आहे. गाव पातळीवर मॅक्रो एटीएममार्फत बँकिंग व्यवहार या बाबी विशेष कौतुकास्पद आहेत, असेही डॉ देशपांडे म्हणाले.
       दिल्लीच्या नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक यादव म्हणाले, कुशल व्यवस्थापन व पारदर्शी कारभार याच्या जोरावरच अडचणीच्या परिस्थितीतून बँकेने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे घेतलेली गरुडभरारी आम्हा सर्वांना व सहकार क्षेत्राला अभिमानास्पद आहे. 
       नेपाळवरून सहभागी झालेल्या नेपाळ कृषी विकास बँकेच्या अधिकारी श्रीमती सृजना अधिकारी म्हणाल्या, संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतातील सहकार चळवळ मजबूत आहे. विशेषता पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यात सहकाराचे जाळे अधिक मजबूत आहे. केडीसीसी बँकेला भेट दिल्यानंतर याची प्रचिती आली.
       तेलंगणा स्टेट को-ऑपरेटिव्ह युनियनचे पदाधिकारी डॉ. भुक्या वेंकण्णा म्हणाले, ऐतिहासिक वारसा लाभलेले कोल्हापूर हे पर्यटन स्थळ आहे. बँकेच्या माध्यमातून येथे शिक्षण संस्था, पर्यटन संस्था, क्रीडा संस्था, हॉटेल व्यवस्थापन आदी अभिनव उपक्रमांसाठी वित्त पुरवठा होत आहे. बँकेची ९२ टक्के कर्ज वसुली ही सहकार क्षेत्राला फारच अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
      स्वागत प्रशासन विभागाचे व्यवस्थापक गोरख शिंदे यांनी केले. प्रशासन विभागाच्या अधिकारी सौ. स्वाती रवींद्र कुंभार यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!