• पिराचीवाडीत श्री हनुमान मंदिराचे उद्घाटन कोल्हापूर • प्रतिनिधी मंदिरे ही जनतेची श्रद्धास्थाने असतात. देव-देवतांच्या आशीर्वादामुळेच सामाजिक आणि राजकीय जीवनात यशस्वी होत आलो आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मंदिराच्या बांधकामाला निधी कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले. पिराचीवाडी (ता.कागल) येथे श्री हनुमान मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री मुश्रीफ बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात लोकनियुक्त सरपंच सुभाष भोसले यांनी दुर्गम व कोरडवाहू असलेल्या पिराचीवाडी गावाचा चेहरामोहरा बदलून सर्वांगसुंदर गाव तयार केले आहे. येथील ऐतिहासिक तलाव व बुरुजाच्या परिसरात श्री हनुमान देवालय साकारले आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या २० लाख निधीतून मंदिर व लोकवर्गणीतून कळस उभारला आहे. मान्यवर, ग्रामस्थ, भाविक भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात टाळ-मृदंगाच्या गजरात ‘राम-लक्ष्मण जानकी, जय बोला हनुमान की’ या निनादात गावातील मुख्य रस्त्यावरून दिंडीही निघाली. दिवसभरात दिंडी पूजन, श्री हनुमंताच्या मूर्तीचे आगमन, होम – हवनसह कलशारोहन, सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन पट्टणकोडोलीच्या रामलिंग भजनी मंडळाचचे भजन असे धार्मिक कार्यक्रम झाले. ३५ वर्षे संघर्षाची….. मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, सुरुवातीला स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे व त्यानंतर स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली काम केले. मंडलिक यांनी सरंजामशाही विरुद्ध लढण्याचे बाळकडू दिले. पस्तीस वर्षांच्या राजकीय संघर्षमय जीवनात सलग पाचवेळा आमदार, मंत्री झालो. गोरगरीब सर्वसामान्य माणसालाच केंद्रबिंदू मानून काम केले. जनतेनेही आशीर्वाद देत पाठराखण केली. २५ वर्षांपूर्वी या विभागाचा पंचायत समिती सदस्य म्हणून लढताना ग्रामस्थांनी ग्रामदैवत श्री दत्त मंदिराच्या बांधकामाचे साकडे घातले, ते पूर्णही केले. त्यानंतर यशाची कमान वाढतच राहिली. एवढी शक्ती जनतेच्या श्रद्धास्थानांमध्ये असते. यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक प्रवीणसिंह भोसले, कागल तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विकास पाटील, बी. एम. पाटील, ह.भ.प. उद्धव जांभळे – महाराज, अरुण भोसले, सागर चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत तानाजी पाटील यांनी केले. सरपंच सुभाष भोसले यांनी प्रास्ताविक केले. आभार पांडुरंग भोसले यांनी मानले. =========================== Attachments areaReplyForward