शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद: डॉ.कादंबरी बलकवडे

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      ‘महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद आहे’, असे उद्गार प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी काढले. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात राज्याच्या गुणवत्ता यादीत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशासकांच्या हस्ते ट्रॉफी व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपआयुक्त शिल्पा दरेकर व प्रशासनाधिकारी डी.सी. कुंभार उपस्थित होते.
      महानगरपालिका शाळांतील तब्बल १० विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकले. कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे शाळा कधी बंद तर कधी सुरु होती. त्यामुळे शिक्षकांनी ऑनलाईन व ऑफलाईन मार्गदर्शन केले. कोरोनामुळे शिष्यवृत्ती परीक्षा होणार कि नाही हे ही निश्चित नव्हते. परंतु ही परीक्षा होणार या आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जायचे असा निर्धार शिक्षक व विद्यार्थ्यांनी केला होता. त्याप्रमाणे शाळेत ऑनलाईन अध्यापन सुरु ठेवले व सराव परीक्षा घेण्यात आली. शासनाकडून मार्गदर्शक सुचनेनुसार शिष्यवृत्ती परीक्षा पार पडल्या आणि महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये राज्य गुणवत्ता यादीत १० तर जिल्हा गुणवत्ता यादीत तब्बल ४७ महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
      सत्कारप्रसंगी मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक व सराव परीक्षेच्या यशस्वी नियोजनाबद्दल संजय शिंदे यांचाही प्रशासकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासनाधिकारी डी.सी. कुंभार यांनी केले तर आभार पर्यवेक्षक विजय माळी यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, पालक, प्राथमिक शिक्षण समितीकडील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!