कचरा घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई होणार
कोल्हापूर • प्रतिनिधी
जानेवारी महिन्यात उघडकीस आणलेल्या कचरा घोटाळ्यातील दोषींवर अद्याप कारवाई केली नसल्यमुळे बुधवारी भाजपाने सकाळी ११ वाजल्यापासून प्रशासकांच्या कार्यालयात ठिय्या मारला होता. शेवटी भाजपाच्या पाठपुराव्याने कारवाईचा अंतिम अहवाल प्रशासकांना सायंकाळी उशिरा देण्यात आला. त्यावर उद्या कारवाईचा आदेश देण्याचे प्रशासकांनी मान्य केले.
महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पावरील कचरा कोणतीही प्रक्रिया न करता कसबा बावडा येथील शेतात पसरल्याची बाब भाजपाने जानेवारी महिन्यात उघडकीस आली होती. अशाप्रकारे कचरा खुल्या शेतात पसरणे हे पर्यावरणाच्या आणि कायद्याच्याही दृष्टीने विघातक असल्याचे भाजपाने प्रशासनास दाखवून दिले होते.
त्यानंतर भाजपाच्या पाठपुराव्याने अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल सादर करून तीन महिने लोटले तरीही या घोटाळ्यात सहभागी दोषींवर कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे गेल्या आठवड्यात भाजपाने दोषींवर कारवाई न केल्यास प्रशासकांच्या कार्यालयात ठिय्या मारण्याचा इशारा दिला.
या इशाऱ्यानंतर एक आठवडा लोटूनही कारवाई न झाल्यामुळे बुधवारी सकाळी साडेदहा वाजता भाजपाचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे व विजयसिंह खाडे-पाटील हे प्रशासक कार्यालयात पोहोचले. तेथे प्रशासकांना भेटून त्यांनी याविषयी कल्पना दिली आणि जोवर कारवाईचा आदेश निघत नाही तोवर कार्यालय सोडणार नाही असे ठणकावून सांगितले.
त्यानंतर दिवसभर भाजपाचे सर्व माजी नगरसेवक तेथेच ठाण मांडून बसले होते. दिवसभरात दोनवेळा प्रशासकांशी तर एकदा अतिरिक्त आयुक्त व उपयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर अखेर अतिरिक्त आयुक्तांनी कारवाईचा अंतिम प्रस्ताव प्रशासकांकडे सोपविला. परंतु आदेश निघेपर्यंत कार्यालय न सोडण्यावर कार्यकर्ते ठाम होते. तेंव्हा प्रशासकांनी कोणत्याही परिस्थितीत उद्या कारवाई आदेश करू, आता आंदोलन थांबवा असे आवाहन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन थांबविले.