शिवाजी विद्यापीठाच्या जलप्रकल्पातून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू

Spread the love

• परिसरातील गवत जनावरांच्या चाऱ्यासाठी पुरविणार
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शहर व परिसरात निर्माण झालेल्या महापूर परिस्थितीमध्ये येथील शिवाजी विद्यापीठाने महानगरपालिका यंत्रणेच्या माध्यमातून शहर व परिसराला पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी उचलली आहे. त्याचप्रमाणे जनावरांच्या चाऱ्यासाठी परिसरातील गवत पुरविण्याचाही निर्णय घेतला आहे.
     कोल्हापूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे काल शहराला पाणीपुरवठा करणारे महानगरपालिकेचे सर्व जलशुद्धीकरण प्रकल्प पाण्याखाली गेल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी पुरविण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न उद्भवल्याचे लक्षात येताच कालपासूनच शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून आपल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे शहराला पाणी पुरविण्याची तयारी केली. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याशी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची चर्चा होऊन आज सकाळपासून महानगरपालिकेच्या टँकरच्या माध्यमातून विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण केंद्रातून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
    त्याचप्रमाणे शहरात ठिकठिकाणी पाळीव पशुधनासाठी चारा छावण्या निर्माण करण्यात आल्या आहेत. पुरामुळे या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या प्राण्यांच्या चाऱ्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या परिसरातून गवत पुरविण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे.
     या संदर्भात माहिती देताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सन २०१९च्या पूरस्थितीमध्ये कोल्हापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यावेळीही शिवाजी विद्यापीठाने महानगरपालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून शहराला पिण्याचे पाणी पुरविले होते. गतानुभव लक्षात घेऊन यंदाही विद्यापीठाने आपली यंत्रणा तयार ठेवली होती. त्यानुसार शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यास आज सकाळपासून सुरवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर असतो. त्यासाठीही विद्यापीठाने आपल्या परिसरातील गवत पुरविण्याची तयारी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!