कोल्हापूर • प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे संशोधक विद्यार्थी सुप्रिम दत्तात्रय धस यांना शिवाजी विद्यापीठाकडून नुकतीच पीएच.डी पदवी प्राप्त झाली. ” सिंथेसिस अँड कॅरेक्टराईझेशन ऑफ द निकेल मँग्नेज ऑक्साईड थीन फिल्म्स बाय केमिकल टेक्निक अँड इट्स सुपरकॅपॅसिटर अँप्लिकेशन्स ’’ हा त्यांच्या पीएच.डी चा मुख्य विषय होता. सुप्रिम धस यांना शिवाजी विद्यापीठाचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ व संशोधन मार्गदर्शक डॉ.आण्णासाहेब मोहोळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
डॉ.सुप्रिम धस यांचे प्राथमिक शिक्षण हे जि.प शाळा व माध्यमिक शिक्षण हे जय मल्हार हायस्कूल पिंपळगांव (धस) ता. बार्शी, जि. सोलापूर येथे झाले. पदवीपर्यंतचे शिक्षण श्री शिवाजी महाविद्यालय (बार्शी) येथे झाले. पुढे त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण (एमएस्सी) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे भौतिकशास्त्र विषयातून पूर्ण केले. यानंतर त्यांनी श्री शिवाजी महाविद्यालय (बार्शी) येथे लेक्चरर म्हणून काम केले. या काळात त्यांना प्रा. (डॉ.) आर.आर. कोठावळे. डॉ. एस. एम. कब्बूर यांचे सहकार्य लाभले. २०१८ साली ते पुणे विद्यापिठाची भौतिकशास्त्र या विषयाची युजीसी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. याचदरम्यान त्यांनी पीएचडीसाठी अर्ज सादर केला आणि यांनतर २०२२ साली शिवाजी विद्यापीठातून आपले पीएच.डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
डॉ.सुप्रिम धस यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये १८ हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. सदरच्या संशोधनासाठी त्यांना डीएसटी. या संस्थेकडून ज्युनिअर रिसर्च फेलोशीप व महाराष्ट्र शासनाच्या सारथी संस्थेतर्फे चीफ मिनिस्टर स्पेशल रिसर्च फेलोशिप मिळाली होती.
याबाबत डॉ. सुप्रिम धस म्हणाले, ऊर्जा टंचाईच्या अलीकडच्या काळात, नवीकरणीय उर्जा स्त्रोतांपासून ऊर्जा मिळवून सोबतच ती ऊर्जा विजेचा रूपात साठवून विविध कारणासाठी उपयोगात आणू शकतो. विद्युत ऊर्जा साठवण्यासाठी सुपरकॅपॅसिटर हे सर्वात कार्यक्षम ऊर्जा साठवण यंत्रांपैकी एक आहे. त्याचे अनेक फायदे आहेत, जसे की उच्च उर्जा घनता, दीर्घकाळ वापर,जलद चार्ज आणि डिस्चार्ज, त्वरित उच्च विद्युत प्रवाह, कमी खर्च, सुलभ देखभाल आणि पर्यावरणाचे प्रदूषण नाही. ऊर्जा साठवण्यासाठी लागणारे नॅनोमटेरिअल्स आम्ही वेगवेगळ्या रासायनिक पद्धतींचा उपयोग करून बनवले. येणाऱ्या काळात सुपरकॅपॅसिटर हे बॅटरीला पर्याय म्हणून वापरू शकतो, त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्नांची सोडवणूक होईल. यामुळे मला यापुढेही या विषयावर संशोधन चालू ठेवायचे आहे. मला माझ्या या वाटचालीमधे माझे आई – वडील, भाऊ, नातेवाईक, मार्गदर्शक व मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभले.