स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका सोनी मराठीवर

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र आणि सार्वभौम स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या रणरागिनी ताराराणी यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” ही मालिका सोमवार (दि.१५)पासून सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
      दरम्यान, स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेनिमित्त रविवारी (दि.१४) कोल्हापुरातील महाराणी ताराराणी चौक येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यास मानवंदना दिली. यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, इतिहासकार जयसिंगराव पवार, खा. डॉ.अमोल कोल्हे, अजय भाळवणकर यांच्यासह मालिकेतील कलाकार उपस्थित होते.
      सोमवार ते शनिवार या कालावधीत संध्याकाळी साडेसात वाजता ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर “स्वराज्य सौदामिनी ताराराणी” या मालिकेतून उलगडणार असल्याची माहिती जगदंब क्रिएशनचे प्रमुख खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही मालिका ताराराणींचा दुर्दम्य आत्मविश्वास, स्वराज्याप्रती अढळ निष्ठा, स्वराज्यासाठी केलेला त्याग आजच्या पिढीसमोर मांडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणाऱ्या जाज्वल्य इतिहासाचे अपरिचित पर्व या मालिकेतून उलगडणार आहे.
      पत्रकार परिषदेस सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर यांच्यासह मालिकेतील कलाकार स्वरदा थिगळे (ताराराणी), संग्राम समेळ (राजाराम महाराज), रोहित देशमुख (धनाजी जाधव), अमित देशमुख (संताजी घोरपडे), यतिन कार्येकर (औरंगजेब), आनंद काळे (सरसेनापती हंबीरराव मोहिते) उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!