पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात जीएसएम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा

Spread the love


कोल्हापूर:
     जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीची माहिती तात्काळ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली’ म्हणजेच पब्लिक ऍड्रेस सिस्टीम (पीएएस) कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या शिरोळ आणि करवीर तालुक्यात ५७ ठिकाणी या यंत्रणेद्वारे पूरपरिस्थिती व मदतकार्याबाबत आवश्यक त्या सूचना प्रसारित करण्यात येत आहेत. गृह राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून जीएसएम तंत्रज्ञानावर आधारित ही यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
     करवीर तालुक्यातील आंबेवाडी, बालिंगे, भुये, चिखली, हणमंतवाडी, निगवे या पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसह २१ गावांमध्ये ‘सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली’ बसविण्यात आली आहे. तर शिरोळ तालुक्यातील औरवाड, अकिवाट, कुरुंदवाड, नृसिंहवाडी, खिद्रापूर, राजापूर, शिरोळ, दत्तवाड, जुने दानवाड, शिरटी आदी ३६ गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.
      जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून अथवा जिल्हा प्रशासनाच्या कोणत्याही अधिकृत ठिकाणाहून एकाचवेळी सर्वत्र सूचना प्रसारित करता येतात. सौरऊर्जेचा वापर करुन ही यंत्रणा तयार करण्यात आली असून अत्यल्प खर्चात देखभाल, दुरुस्ती होते.
      सध्याच्या पूरपरिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन कक्षातूनच करवीर व शिरोळ तालुक्यातील नागरिकांपर्यंत प्रशासनाच्या  सूचना तात्काळ प्रसारित करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या प्रणालीद्वारे नागरिकांना सूचना केल्या. या प्रणालीमुळे  प्रशासकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सूचना देण्याचा वेळ व इंधनाची बचत होते. याबरोबरच नागरिकांनाही वेळेत सूचना मिळाल्यामुळे पूर परिस्थितीत वेळेत स्थलांतर करणे, स्थलांतर करताना आवश्यक सूचनांचे पालन करणे, मदतीविषयी वेळेत माहिती मिळत आहे.
                                     — वृषाली पाटील,
  माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!