कोरोना रुग्णांची ऑनलाईन नोंद न करणाऱ्या खासगी हॉस्पीटल व प्रयोगशाळांवर कारवाई करा: पालकमंत्री

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
      कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद वेळेत झाल्यास त्यांच्या वारसांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देता येते. यासाठी कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ऑनलाईन नोंद पोर्टलवर करणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णांची माहिती व झालेल्या मृत्यूची ऑनलाईन नोंद पोर्टलवर करत नसलेल्या खासगी हॉस्पिटल व प्रयोगशाळांना नोटीस पाठवून त्यांच्यावर कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.
      कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आढावा बैठक शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झाली. यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिक्षीत, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
      कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सीपीआरला आवश्यक ते अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे सांगून  पालकमंत्री सतेज पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. ते म्हणाले, जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांसाठी आवश्यक ती साधनसामग्री व औषधसाठ्याची मागणी तात्काळ नोंदवून घ्यावी. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या यंत्रसामुग्रीची देखभाल दुरुस्ती वेळेत करावी. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यात आढळून आलेले बाधित रुग्ण, झालेले मृत्यू, अतिजोखमीच्या आजाराच्या रुग्णांचा मृत्यू आदी बाबींचा  तालुकानिहाय अभ्यास करावा. याचा उपयोग तिसऱ्या लाटेमध्ये संबंधित तालुक्यांवर अधिक लक्ष देण्यासाठी होईल.
     पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा उपाय आहे. जिल्ह्यातील १८ वर्षावरील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करा. नागरिकांनी लसीकरण करुन घेण्यासाठी विविध माध्यमांद्वारे आवाहन करावे. शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन करण्यासाठी  जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम (PAS) चा प्रभावीपणे वापर करावा.
      कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी सीपीआर येथे येतात. याठिकाणी येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने सीपीआर परिसरातील खराब झालेले साहित्य हटवून हा परिसर स्वच्छ ठेवा, असेही त्यांनी आवर्जुन सांगितले.
—————————–

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!