बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा: रुपाली चाकणकर

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
      बालविवाह ही गंभीर समस्या असून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सरपंच यांना प्रशिक्षण देवून कायद्याअंतर्गत त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्यांबाबत जाणीवजागृती करावी. बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आणि महिला व बालविकास विभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केल्या.
      जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात श्रीमती चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस विभागाची बैठक झाली, यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील (गृह), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, पोलीस आणि महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत महिला व बाल विकास विभागाच्या महिला समुपदेशन केंद्राला भेट देवून कामाची माहिती घेतली.
      श्रीमती चाकणकर म्हणाल्या, बालविवाह ही अत्यंत गंभीर समस्या आहे. बाल विवाहामुळे माता मृत्यू, बाल मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. बालविवाहाच्या घटना  वेळीच रोखणे आवश्यक आहे. बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी आहेत. या घटना रोखण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका असून अशा घटना आढळल्यास ग्रामसेवकांना जबाबदार धरुन कारवाई करावी, अशा सूचना देवून बालविवाहाच्या घटना घडू नयेत, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
       श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महिलांवर कामाच्या ठिकाणी अत्याचार होवू नये, यासाठी शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ स्थापन करणे बंधनकारक आहे. अशा समित्या सर्व आस्थापनांमध्ये स्थापन झाल्याची खात्री पोलीस विभागाने करावी.
भरोसा सेल अंतर्गत प्राप्त तक्रारीं प्रकरणी जलदगतीने समुपदेशन उपलब्ध करुन द्यावे. समुपदेशनाला उपस्थित न राहणाऱ्यांना कडक नोटीस बजावावी.
      कौटुंबिक हिंसाचारामुळे पिडीत व घराचा आधार नसलेल्या महिलांना आधार गृह, तेजस्विनी महिला वसतिगृह व सखी वन स्टॉप सेंटरमध्ये दाखल करून आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.
      कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक शोषण, बालविवाह आदी कोणत्याही प्रकारचे अत्याचार महिलांवर घडू नयेत, यासाठी समाजाने मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
       महिलांचे होणारे शोषण टाळण्यासाठी निर्भया पथकाबाबत व्यापक जनजागृती करावी. संकट काळात महिलांनी १००,११२, १०९१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. जेणेकरून पोलीस विभागाच्यावतीने जलदगतीने मदत उपलब्ध करून देता येईल. कोल्हापूर पोलीस विभागाच्या मदत कक्षाला फोन केला असता अवघ्या काही मिनिटांत मदतीसाठी पोलीस उपस्थित झाल्याचे उदाहरण सांगून पोलीस विभागाचे काम चांगल्या प्रकारे सुरु असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
      श्री. बलकवडे यांनी प्रस्ताविकातून जिल्ह्यातील महिलांविषयक गुन्ह्यांची व गुन्हे रोखण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
——————————————————- Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!