कोल्हापूर • प्रतिनिधी
वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रस्तावित जीएसटी वाढीचे दर कमी करण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्यावतीने जीएसटी कौन्सिलकडे प्रयत्न करून निर्णय मिळवला जाईल, असे आश्वासन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ललित गांधी यांना दिले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्यावतीने अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी नवी दिल्ली येथे नामदार पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना वस्त्र उद्योगासमोरील विविध समस्यांचे निवेदन सादर केले.
विशेषता: वस्त्रोद्योगातील प्रस्तावित जीएसटी दरवाढीमुळे या उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता असून ही दरवाढ रद्द करणे आवश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन ललित गांधी यांनी केले.
केंद्रीय वाणिज्य, उद्योग, ग्राहक संरक्षण, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वस्त्र उद्योगासमोरील अडचणींची सरकारने योग्य दखल घेतली असल्याचे सांगून, दरवाढीचा हा निर्णय जीएसटी कौन्सिलने घेतला असल्याने यासंदर्भात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे जीएसटी कौन्सिलकडे पाठपुरावा करून ही दरवाढ रद्द करून घेण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.
ना. पियुष गोयल यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रात विशेषता: तांत्रिक वस्त्रोद्योग वगैरेसारख्या नवीन क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध असून आगामी काळात ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने’ पुढाकार घेऊन नवीन संधीची माहिती व्यापार-उद्योग क्षेत्रापर्यंत पोहोचवावी व अधिकाधिक लोकांना नव्या संधीचा फायदा करून द्यावा असे आवाहन केले.
याप्रसंगी ‘फिक्की’चे माजी अध्यक्ष झायडस कॅडीला, चेअरमन पंकज पटेल, महाराष्ट्र चेंबरचे कौन्सिल मेंबर मनप्रीत नागी, दिल्ली प्रतिनिधी जे.के.जैन यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
——————————————————-