ग्रामविकास मंत्र्यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा

Spread the love

ग्रामविकास मंत्र्यांनी घेतला
पूर परिस्थितीचा आढावा
कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)
      जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेमध्ये आज आढावा घेतला.
    यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील, मनपा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण,  माजी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, अधिक्षक अभियंता महेश सुर्वे उपस्थित होते.
    ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होत आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर आणि धरणांतून विसर्ग सोडल्यास सन २०१९ पेक्षा जिल्ह्यात पुराची गंभीर परिस्थिती निर्माण होईल. पूर परिस्थितीत प्रशासन चांगले काम करत आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देवून वेळीच स्थलांतरित होवून सहकार्य करावे. पुरामुळे स्थलांतरित केलेल्या नागरिकांना प्रशासनाने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. त्याचबरोबर पुरामुळे राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या लोकांची सोय करण्यास प्राधान्य द्यावे. कोणाची गैसोय होऊ नये याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना देऊन ग्रामविकास मंत्र्यांनी शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थिती, कृष्णा नदीची पाणी पातळी, कोयना व अलमट्टी धरणातील विसर्गाची माहिती घेतली. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने शिरोळ तालुक्यात सर्व टिम कार्यरत ठेवा अशा सूचना त्यांनी दिल्या.
      यावेळी कोल्हापूर शहरातील पूर परिस्थितीची माहिती मनपा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंत्री महोदयांना दिली.
                 पूर पाहण्यास गर्दी करु नये…..
     संततधार पावसामुळे नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. पाण्याचा वेग मोठा असल्याने पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करु नये असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
      यावेळी ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या बैठकीतूनच व्हिडीओ  कॉलद्वारे कागलमधील पूर परिस्थिती आणि उपाय योजनांची माहिती घेतली.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!