कोल्हापूर • प्रतिनिधी
प्रभावी अध्यापन करायचे असेल तर शिक्षकांनी अध्यापनामध्ये बदलत्या तंत्रज्ञानाचा ध्यास घेणे काळाची गरज आहे. ज्ञान, आकलन या बरोबरच शिक्षकांनी उपयोजनात्मक शिक्षण पद्धती राबविली पाहिजे यासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य, संसाधने व सॉफ्टवेअर्स बद्दल माहिती असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद साताराचे तंत्रस्नेही शिक्षक सागर राऊत यांनी केले.
संजय घोडावत विद्यापीठाने आयोजित केलेल्या शिक्षक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ.एन.के.पाटील, संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी व सर्व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमात सागर राऊत यांनी ओपन ब्रॉडकास्टींग सॉफ्टवेअरबद्दल माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखविले. याचबरोबर त्यांनी टिचिंग लर्निंगवरती तयार केलेले सर्व व्हिडीओ केएस एज्युकेअर या चॅनेलवरती पाहण्यासाठी शिक्षकांना आवाहन केले.
या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते गतवर्षी डॉक्टरेट पदवी मिळविलेल्या प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला.
कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल कसा घडवून आणता येईल यावर मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात विश्वस्त विनायक भोसले यांनी तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे व त्याचा वापर सध्याच्या कोरोना काळात विद्यापीठाच्या सर्व शिक्षकांनी केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.स्नेहल शिंदे यांनी केले तर आभार डॉ. एन.के.पाटील यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.आबिद सलाती व ग्रंथपाल प्रा. कांतीलाल ताम्हाणे व टीम यांनी केले.