फुटबॉल हंगामासाठी संघ व खेळाडूंची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होणार

• केएसए आणि वरिष्ठ संघ प्रतिनिधींची बैठक 
कोल्हापूर • प्रतिनिधी
     सन २०२१-२२ फुटबॉल हंगामासंदर्भात फुटबॉल संघ आणि वरिष्ठ गटातील सोळा संघांच्या प्रतिनिधींची बैठक शनिवारी केएसए कार्यालयात झाली. यामध्ये सन २०२१-२२ फुटबॉल हंगामासाठी संघ आणि खेळाडूंची नोंदणी संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे सांगितले. तसेच कोविड-१९ बाबत स्थानिक प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार लिगचे सामने  घेण्याबाबत चर्चा झाली.
     सध्या कोरोनाचा धोका कमी होत आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्याने विविध खेळांच्या स्पर्धा सुरू आहे. त्याअनुषंगाने कोरोनामुळे बंद असलेला कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम केव्हा सुरू होणार, याकडे सर्व फुटबॉल संघ, खेळाडू यांच्यासह फुटबॉल शौकिनांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. नव्या फुटबॉल हंगामाचे सर्वांनाचे वेध लागले होते. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.१३)  केएसए व संघ प्रतिनिधींची बैठक झाली.
     या बैठकीला केएसएचे सचिव माणिक मंडलिक, सहायक सचिव राजेंद्र दळवी, फुटबॉल सेक्रेटरी अमर सासने यांच्यासह नितीन जाधव, संभाजीराव मांगोरे – पाटील,  विश्वंभर मालेकर – कांबळे, मनोज जाधव, दीपक राऊत आणि  वरिष्ठ गटातील सोळा संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
     केएसए व फुटबॉल संघ प्रतिनिधींच्या बैठकीत सन २०२१-२२ हंगामासंदर्भात चर्चा झाली. या फुटबॉल हंगामासाठी संघ व खेळाडू यांची नोंदणी संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. याबाबतचे प्रात्यक्षिक व माहिती संघांना लवकरच देण्यात येणार आहे. कोविड-१९ बाबत स्थानिक प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार फुटबॉल लिग सामने घेण्यात येणार आहेत. यासाठी संघ ऑफिशियल्स व खेळाडू यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण असणे बंधनकारक आहे. तसेच आरटीपीसीआर चाचणीबाबत विचार करण्यात येणार आहे. 
भविष्यात हंगामाबाबत कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्यास त्यास केएसए जबाबदार राहणार नाही, याची माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *