महानगरपालिकेस रु.२३७ कोटी ४७ लाखांच्या निधीस तांत्रिक मंजुरी: क्षीरसागर

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजने अंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीमधील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांकरिता राज्य शासनाने रु.२३७ कोटी ४७ लाखांच्या निधीस तांत्रिक मंजुरी दिली असून, या निधीतून कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख ८२ रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
     शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेस शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारूगले, नंदकूमार मोरे, रविकिरण इंगवले, ऋतुराज क्षीरसागर आदी उपस्थित होते.
     राजेश क्षीरसागर म्हणाले की, शहरातील या विकासकामांना एप्रिल महिन्यात सुरूवात होईल आणि जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण केली जातील. रस्त्यांचा दर्जा चांगला होण्यासाठी लक्ष दिले जाईल. कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत महानगरपालिका हद्दीतील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांचा रु.१८९.५५ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने ही मागणी २०१७ पासून केली आहे. परंतु, आजतागायत हा प्रस्ताव प्रलंबित होता. काही त्रुटी आणि सुधारणा करून हा प्रस्ताव शासन स्तरावर पुन्हा सादर करण्यात आला. याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. यास सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.१७ ऑगस्ट २०२१ रोजी मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून नव्याने सादर केलेल्या रु.२०३ कोटींच्या प्रस्तावास मान्यता दिली. या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य शासनाने दि.१३ जानेवारी २०२२ रोजी कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजने अंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास करण्यासाठी रु.२३७,४७,२०,७१७/- इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी दिली आहे.
एकूणच मर्यादित उत्पन्न स्त्रोतामुळे कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. अशातच सन २०१९ आणि सन २०२१ च्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातून वाहणाऱ्या पंचगंगा नदी व त्यास जोडणाऱ्या नाल्यांमुळे शहरास महापुराचा फटका बसला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुमारे ८२ प्रभागांपैकी सुमारे ३५ प्रभाग महापुराच्या पाण्याने बाधित झाले होते. त्यामुळे या पूरबाधित प्रभागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, नागरिकांना यातून वाहतूक करणे जिकिरीचे होत आहे. या निधीद्वारे कोल्हापूर शहरातील प्रमुख वर्दळीचे ८२ रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, गटर, ड्रेनेज लाईन  व फुटपाथ यांचा सुनियोजित विकास करण्यात येणार आहे.
                     ‌‌   निधीतून होणारी कामे…..
     या निधीमधून शहरातील प्रमुख २० किलोमीटरचे रस्ते, उपरस्ते १५ किलोमीटर लांबीचे व त्यांना जोडणारे ३० किलोमीटर लांबीचे रस्ते, स्ट्रॉम वॉटरसह भुयारी गटार, फुटपाथ व इतर कामांचा समावेश आहे. यामध्ये गंगाई लॉन ते नृसिंह देवालय फुलेवाडी रिंगरोड, खरी कॉर्नर ते गांधी मैदान ते निवृत्ती चौक ते उभा मारुती चौक, मंगेशकरनगर उद्यान ते भोसले हॉस्पिटल बेलबाग, उचगाव जकात नाका ते टेंबलाई नाका उड्डाणपूल, राधानगरी रोड ते गंगाई लॉन, स्टेशन रोड ते सायबा हॉटेल ते महावीर कॉलेज, वाइल्डर मेमोरियल चर्च ते पेडणेकर कलादालन, आरटीओ ऑफिस ते रमणमळा पोस्ट ऑफिस, शुगर मिल चौक ते बुचडे घर, संयुक्त महाराष्ट्र हौ.सोसा. राजारामपुरी ते दीपा गॅस एजन्सी, वृषाली हॉटेल ते पर्ल हॉटेल, कोरगावकर हायस्कूल ते शाहू चौक, राजारामपुरी माऊली पुतळा ते गोखले कॉलेज चौक, पांजरपोळ ते शाहू मिल कॉलनी, पांजरपोळ ते यादवनगर मेन रोड, फुलेवाडी संपूर्ण बस रोड, गुजरी कॉर्नर ते रंकाळा स्टँड ते गंगावेश ते शिवाजी पूल ते तोरस्कर चौक, दसरा चौक ते बिंदू चौक ते मिरजकर तिकटी ते आयटीआय चौक, भगतसिंग चौक ते पापाची तिकटी ते रिलायन्स मॉल, शुक्रवार गेट ते जाऊळाचा गणपती, आरटीओ ऑफिस ते मेरीवेदर ग्राउंड, शनिवार पेठ पोस्ट ऑफिस ते शुकवार गेट पोलीस चौकी, उभा मारुती चौक ते राजघाट आदी प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.
                            विकासाचा ध्यास…..
     कोल्हापूर शहराच्या विकासाचा ध्यास शिवसेनेने घेतला असल्याचे सांगून राजेश क्षीरसागर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि नग‌रविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक भुमिकेमुळेच कोल्हापूर शहरास भरघोस निधी मंजूर होत आहे. आगामी काळात शहरातील प्रमुख प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी असाच पाठपुरावा सुरु ठेवला जाणार आहे. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचेही सांगितले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!