करवीर तहसिल कार्यालयासाठी सुमारे १५ कोटी निधीला महसूलमंत्र्यांची मान्यता

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) तथा कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर शहरातील करवीर तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मान्यता दिली असून त्याकरिता १४ कोटी ९८ लाख ८२ हजार ४८६ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे करवीर तहसिल कार्यालयास लवकरच सुसज्ज इमारत मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
     इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिल्याचा शासन निर्णय गुरुवारी निगर्मित करण्यात आला आहे. यामुळे करवीर तालुक्यातील नागरिकांना सुसज्ज व सर्व सुविधांनी युक्त अशी प्रशासकीय इमारत लाभणार आहे. याच इमारतीतील करवीर पोलीस ठाण्याच्या बांधकामासाठी  ७३ लाख २३ हजार ८९८/- इतका निधी गृह विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री ना. पाटील यांनी सांगितले.
       गेल्या अनेक वर्षांपासून करवीर तहसिल कार्यालय आणि करवीर पोलीस ठाणे भाऊसिंगजी रोडवरती एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता. कार्यालयासदेखील खुराड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे सुसज्ज इमारतीमध्ये नविन तहसिल कार्यालय सुरू करण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. त्याची दखल घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजुरीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार आता निधी मंजूर झाला आहे. निधी मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यानी सहकार्य केल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!