कोल्हापूर • प्रतिनिधी
कोरोना संक्रमण प्रतिबंध आणि लसीकरणात कोल्हापूरवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी भाजपाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना साकडे घातले. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री राजेश टोपे यांची आज भाजपा शिष्टमंडळाने भेट घेतली.
मार्चपासून सुरु झालेली कोरोनाची दुसरी लाट कोल्हापुरात थांबायचे नाव घेत नाही. योग्यवेळी प्रशासनाने निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे कोरोना संक्रमण रोखण्यात जिल्हा व महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत. गेले दोन महिने रोज सरासरी दीड हजार रुग्ण सापडत आहेत. निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला योग्यवेळी जाब विचारणे आवश्यक होते ते केले नाही. तसेच लसीकरणाच्या बाबतीत कोल्हापूरला सापत्नभावाची वागणूक मिळत आहे. कोरोना संक्रमण आणि लसीकरण याबाबत राज्य सरकार कोल्हापूरवर अन्याय करीत आहे. तो अन्याय तातडीने दूर करावा असे भाजपच्या शिष्टमंडळाने आरोग्यकमंत्री राजेश टोपे यांना साकडे घातले.
कोल्हापुरात कोरोना संक्रमणात प्रशासनाला आलेले अपयश आणि लसीकरणात कोल्हापूरवर होणारा अन्याय यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला होता. परंतु प्रशासनाच्या मध्यस्थीने सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्यमंत्र्यांनी भाजपच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव व भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आरोग्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार करून निवेदन दिले.
याप्रसंगी बोलताना भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव म्हणाले, प्रशासनाकडून तसेच राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील अन्य पक्षांच्या नेत्यांकडून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. फेब्रुवारी २०१९ पासून संपूर्ण देशभरात कोरोनाची दुसरी लाट पसरू लागली. कोल्हापूर शहर व जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याच्या अखेरीसपासून वेगाने रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली. मे व जून हे दोन्ही महिने कोल्हापुरातील रुग्ण संख्या, पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्युदर हे सर्वाधिक होते. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या कमी असताना गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत प्रचाराला वाव मिळावा म्हणून, राज्य शासनाने व केंद्र शासनाने घालून दिलेल्या कोविड संक्रमण प्रतिबंधक निर्बंधांची अंमलबजावणी कठोरपणे करण्यात आली नाही. त्यामुळेच कोल्हापुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत जाऊन सध्या सरासरी पंधराशे रुग्ण दररोज इतकी वाढली आहे. सध्याची स्थिती पहाता राज्यकर्त्यांनी कितीही खोटे बोलले तरी कोल्हापूर जिल्ह्याची लसीकरण आणि कोरोना संक्रमणबाबतची वस्तुस्थिती लपविता येत नाही याचा प्रत्यय कोल्हापूरकर घेत आहेत. रुग्णसंख्या कमी असताना, वाढत्या रुग्ण संख्येवर वेळीच आळा घालण्याकरीता प्रशासनाने निर्बंधाची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक होते ते त्यावेळी केले गेले नाही आणि हे करण्यासाठी राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनास कोणताही जाब विचारण्यात आला नाही. याबद्दल आम्ही राज्य शासनाचा आणि कोल्हापूर प्रशासनाचा निषेध करत आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, अजित ठाणेकर यांनी आपले विचार मांडले.
शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी लसीकरण कमी झाल्याचे मान्य केले. तर प्रशासन कामात हलगर्जीपणा करत असेल तर पुन्हा एकदा सक्त सूचना देऊ असेही त्यांनी सांगितले. लसीकरणाबाबत यापुढे कोल्हापूरला झुकते माप देऊ असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले. त्याचबरोबर खाजगी हॉस्पिटलकडून रुग्णांना आकारल्या जाणाऱ्या बिलाचे ऑडिट अधिक सक्षमपणे करण्याबाबतच्या सूचना नूतन जिल्हाधिकारी रेखावर यांना दिल्या. जर संक्रमण कमी झाले असे प्रशासनाचे मत असेल तर सर्वच व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या या भाजपच्या मागणीसही आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
याप्रसंगी संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, यांच्या विजयसिंह खाडे, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, संजय सावंत, संतोष भिवटे, रविंद्र मुतगी, आजम जमादार आदी उपस्थित होते.