गोकुळच्या चेअरमननी दिले संचालक व कर्मचाऱ्यांना योगाचे धडे


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
     दैनंदिन कामाच्या धावपळीत माणसाला उसंत मिळत नाही. कामाचा व्याप, पैशामागची धडपड किंवा यश, कीर्ती, अर्थप्राप्ती इत्यादीमध्ये आरोग्य रक्षण होऊनही दीर्घायुष्य हा भाग चिंतनीय आहे. सध्याच्या युगात माणसाकडे पैसा, सत्ता, मान असूनही आरोग्य किंवा सुखाची प्राप्ती हि दुरापास्त वाटणारी गोष्ट झालेली आहे. आरोग्य टिकणाऱ्या प्रचलित प्रणालीतही विविधांगी विचार करूनही माणूस मात्र सुखायू किंवा दीर्घायू होऊ शकलेला नाही हे सत्य आहे. त्याकरिता योग हा सध्याच्या धावपळीच्या जगात एकमेव उपाय आहे. नियमित योगामुळे शरीर निरोगी राहते. निरोगी शरीरामध्ये आनंदी मन राहते. यामुळे कार्यक्षमता वाढते. नित्य नियमाने योगासने करणे हा चांगला उपाय आहे, असे प्रतिपादन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले. ते योग शिबीरादरम्यान बोलत होते.
    गोकुळच्या ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील कार्यालयामध्ये संचालक व कर्मचाऱ्यांसमवेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिराप्रसंगी कर्मचाऱ्यांना स्वतः योगाची प्रात्यक्षिके दिली.
     यावेळी योग विद्येतील विविध योगासनांची प्रात्यक्षिके उदाहरणार्थ सर्वांगासन, पादान्गुष्टासन, शशकासन, मंडूकासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, विपरीतनौकासन, पर्वतासन, ताडासन इत्यादी आसने चेअरमन श्री. पाटील यांनी कर्मचाऱ्यांसमोर सादर करून सदरची योगासने कर्मचाऱ्यांकडून करवून घेतली. ही आसने नित्यनियमाने गोकुळ परिवारातील सर्व घटकांनी करावीत असे आवाहनही त्यांनी केले.
     स्वतःच्या शरीर तंदुरुस्तीचे गमक सांगताना चेअरमन श्री. पाटील यांनी आपण आपला दैनंदिन कामाचा व्याप सांभाळून दररोज ४० मिनिटे योगासने व ५० मिनिटे चालण्याचा व्यायाम करत असल्याचे सांगितले.
     यावेळी संचालक अजित नरके, बाळासाहेब खाडे, संभाजी पाटील, चेतन नरके, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणकेर यांनी योगाचे प्रात्‍यक्षिके करून दाखवली. सूत्रसंचालन एम. पी. पाटील यांनी तर आभार कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी मानले.
      यावेळी चेअरमन विश्वास पाटील, संचालक अजित नरके, नंदकुमार ढेंगे, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, अंबरिशसिंह घाटगे, चेतन नरके, कार्यकारी संचालक डी.व्‍ही.घाणकेर, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, डेअरी मॅनेजर चौधरी, संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *