मराठा आंदोलनाचे निर्णय छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच होणे गरजेचे

• कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती
कोल्हापूर • प्रतिनिधी
     मराठा आरक्षणावर सुरू असलेल्या आंदोलनाचे निर्णय छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालीच होणे गरजेचे आहे, असे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने म्हटले आहे.
     या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात गेली कित्येक वर्ष लढा चालू आहे. यासाठी आज आरपारची लढाई सुरू आहे. मराठा समाजातील सर्वच घटकांनी आपआपले राजकीय पक्ष, संघटना बाजूला ठेवून खासदार छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली सर्वसहमतीने हे आंदोलन निर्णय होईपर्यंत चालू ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय झालेला आहे.
     यामध्ये अगदी १९८२ सालापासून या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या घटकांनी सहभागी होऊन एकसंघ आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.
असे असताना छत्रपती संभाजीराजे व  प्रमुख समन्वयकांच्या अपरोक्ष एखाद्या आंदोलनाची हाक देणे अयोग्य आहे. आंदोलन करणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क व अधिकार आहे पण एखाद्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा समाजाने एकमुखाने निर्णय घेतला असेल आणि त्याउलट कोणी समाजबांधव आंदोलनाची हाक देत असेल तर ते चुकीचे होईल. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या  कोल्हापुरातच नेतृत्व व प्रमुख समन्वयकांच्या सहमतीशिवाय आंदोलन होत आहे, असा चुकीचा संदेश राज्यात आणि देशपातळीवर जाईल आणि मूळ विषयाला बगल मिळून मुख्य आरक्षणाच्या प्रश्नाचे गांभीर्य संपेल याची नोंद सर्वच समाजबांधवांनी घेणे गरजेचे आहे. या आंदोलनातील एखादा टप्पा आंदोलन करायचा असेल तर समन्वयक आणि छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर करावा, त्याप्रमाणे सर्व समाजबांधव सक्रिय होतील.
      अशोक पवार, ॲड. रणजीत गावडे, रमेश मोरे, दादासो लाड, माणिक मंडलिक, भाऊ घोडके, महेश बा. जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी, राजेश वरक, अजित सासणे, विनोद डुणूंग, पप्पू सुर्वे आदींनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *