जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक लसीचे अधिकाधिक डोस मिळण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार: जिल्हाधिकारी

Spread the love


कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)
      कोल्हापूर जिल्ह्याचा रुग्णदर नियंत्रणात आणण्यासाठी ९ हजारावरुन २८ ते ३० हजारांपर्यंत तपासण्या वाढवण्यात आल्या असून लसीकरणावर देखील भर देण्यात येत आहे. जिल्ह्याला अधिकाधिक डोस उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
      कोविड-१९ प्रतिबंधाच्या दृष्टीने लसीकरणाबाबत आज जिल्हाधिकारी दौलत  देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्र.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.फारुख देसाई, सीपीआर रुग्णालयाच्या बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक, महानगरपालिकेचे माता बाल संगोपन अधिकारी डॉ. अमोल माने आदी उपस्थित होते.
     उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूर भेटीदरम्यान कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यात तपासण्यांची संख्या २० हजारांपर्यंत वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. यादृष्टीने जिल्ह्यात तालुकानिहाय नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जिल्ह्यात २८ ते ३० हजार तपासण्या होताहेत, ही समाधानाची बाब आहे. लसीकरणाच्या बाबतीतही कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे, मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्याला डोस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे पुरेशा प्रमाणात लसीकरण होत नाही. यासाठी दर दिवशी ५० हजारांपर्यंत लस राज्य शासनाने जिल्ह्याला पुरवावी, याबाबत आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात येईल. सध्या उपलब्ध असणारी लस दिव्यांग, परदेशी जाणारे विद्यार्थी, नोकरदार व तृतीयपंथी यांना निश्चित दिवशी प्राधान्याने देण्यात यावी. आरोग्य सेवकांना दुसरा डोस देण्यासाठीही पाठपुरावा करा, अशा सूचना श्री. देसाई यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
ज्या तालुक्यामध्ये ग्रामीण व नागरी भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, त्यांना जास्त पुरवठा करून प्रथम ६० वर्षावरील व त्यानंतर ४५ ते ६० वर्षे वयाच्या नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
     रुग्णसंख्या कमी होण्यासाठी ६० वर्षावरील नागरिकांनी पहिला व दुसरा डोस तसेच ४५ वर्षावरील नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेनुसार लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी केले.
बैठकीला  संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!