आमच्या आघाडीच्या विजयाचे महाद्वार कागलमधून उघडणार: मंत्री हसन मुश्रीफ

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होईल. आमच्या आघाडीच्या विजयाचे महाद्वार कागलमधून उघडणार, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून बँकेचा कारभार सातत्याने राजकारणविरहित केला, असेही ते म्हणाले.
     कागल तालुक्यातील मंडलिक गट, मुश्रीफ गट व माजी आमदार संजयबाबा घाटगे गटाच्या ठराव धारकांच्या संयुक्त मेळाव्यात, मंत्री मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.
     श्री. मुश्रीफ म्हणाले, तालुक्यात एकूण ८३७ ठरावधारक आहेत. त्यापैकी ८०० महाविकास आघाडीचे आहेत. प्रशासकाची सत्ता जाऊन सहा वर्षांपूर्वी बँकेचा कारभार हाती घेतला. त्यावेळी १३७ कोटी संचित तोटा होता. थकित कर्ज वसुलीचे फार मोठे आव्हान समोर होते. तशाही परिस्थितीत वसुलीसाठी हलगी, ताशा, सनई, चौघडा घेऊन प्रसंगी मित्रमंडळींच्यासुद्धा दारात गेलो. बँकेचे मालक म्हणून नव्हे तर, विश्वस्त म्हणून कामकाज केले. 
     ते पुढे म्हणाले, बँकेची गाडी, नाश्ता, जेवण, हॉटेल भाडे, प्रवास भाडे या कोणत्याही सुविधा घेतल्या नाहीत. माझ्यासह संचालक मंडळातील माजी आ. महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांच्यासह कुणीही या बँकेचा पाच पैशाचासुद्धा लाभ घेतलेला नाही, हे अभिमानाने सांगेन. बँकेचा मालक असलेल्या शेतकर्‍यांसह, कर्मचारी, पगारदार, नोकरदार व गटसचिवांनाही विमासुरक्षा लागू केल्याचेही ते म्हणाले. 
      महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करूया. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्यावर नियतीनेच सातत्याने अन्याय केला आहे, त्यांनाही योग्य तो मान सन्मान मिळावा, अशी आपली भावना आहे.
     खासदार संजय मंडलिक म्हणाले, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता आहे. स्वर्गीय शामराव भिवाजी पाटील, स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक आणि अलिकडच्या काळात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाने बँकेचा लौकिक वाढविला आहे. हा लौकिक टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुम्हा – आम्हा सर्वांची आहे. गेल्या सहा वर्षाच्या कार्यकाळात बँकेने सर्वोच्च लौकिक मिळविला आहे. त्यामुळे, निवडणूक बिनविरोध व्हायला हवी. सहा वर्षांपूर्वी बँकेच्या संचालक मंडळात गेल्यानंतर अत्यंत अडचणीत असलेल्या बँकेचा परवाना राहतोय की नाही, अशी शंका वाटत होती. केडीसीसी बँकेच्या निमित्तानेच मंडलिक गट आणि मुश्रीफ गट असा वाद निर्माण झाला होता व संघर्ष झाला होता. परंतु होऊ घातलेल्या निवडणुकीत कागल तालुक्यातील मंडलिक गट, मुश्रीफ गट व संजयबाबा घाटगे गट एकत्र येत आहोत, ही चांगली गोष्ट आहे.
     यावेळी माजी आ. संजयबाबा घाटगे, चंद्रकांत पाटील-बिद्री व धनराज घाटगे -वंदूरकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
     बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर बँकेचे संचालक अनिल पाटील, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ.शिवानी भोसले, जिल्हा परिषद सदस्य अमरीश घाटगे, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, गणपतराव फराकटे, बापूसाहेब शेणवी, रमेश तोडकर, सूर्यकांत पाटील, दिनकरराव कोतेकर, बाजीराव गोधडे, एम.आर.चौगुले, रमेश माळी, बापूसाहेब भोसले, जयसिंगराव भोसले, दत्ता पाटील, प्रवीणसिंह भोसले आदी उपस्थित होते.
     स्वागत मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. आभार विकास पाटील यांनी मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!