‘बाहुबली २’ चित्रपटाची भव्यता आता मराठीत; अमोल कोल्हे यांच्या आवाजात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी  
      ‘बाहुबली: द बिगिनिंग’ प्रदर्शित झाला आणि ‘बाहुबली द कन्क्ल्युजन’ येईपर्यंत थोरामोठ्यांच्या ओठांवर एकच प्रश्न होता ”कटप्पाने बाहुबली को क्यु मारा?” शेमारु मराठीबाणा चित्रपट वाहिनीने हा अभूतपूर्व अनुभव मराठी भाषेत प्रदर्शित केला आणि मराठी प्रेक्षक “कटप्पा नं बाहुबली ला मारलं,पण का?” असं विचारू लागले. याचं उत्तर घेऊन शेमारु मराठीबाणा येत आहे रविवारी, १३ मार्चला दुपारी १२:०० वाजता आणि रात्री ९.०० वाजता.
      दिवाळीचं औचित्य साधून शेमारू मराठीबाणा चित्रपट वाहिनीने बाहुबली या महाचित्रपटाचा पहिला भाग मराठी भाषेमध्ये प्रदर्शित केला आणि मराठी भाषिक प्रेक्षकांच्या डोळ्यांसह कानांनाही एक अविस्मरणीय अनुभव दिला. कारण बाहुबलीच्या भव्यदिव्य चित्रांना, पात्रांना लाभलेले आवाज मात्र अगदी ओळखीचे होते. एक अजरामर कलाकृती आपल्याला अत्यंत जवळच्या वाटणाऱ्या कलाकारांच्या आवाजात आपल्या भाषेत अनुभवता आल्याने प्रेक्षकांनी या सिनेमाला भरभरून दाद दिली आणि त्यामुळेच ते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते.  
      प्रेक्षकांच्या पसंतीला कौल देत ‘शेमारु मराठीबाणा’ ’बाहुबली: द कन्क्ल्युजन’ दि. १३ मार्च रोजी घेऊन येत आहे. डॉ.अमोल कोल्हे, सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, मेघना एरंडे, संस्कृती बालगुडे, उदय सबनीस यांनी आपल्या आवाजांनी बाहुबली मधल्या गाजलेल्या व्यक्तिरेखा मराठी भाषेत पुनरुज्जीवित केल्या आहेत. बाहुबली मराठीची प्रवीण तरडे यांनी क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून जबादारी पार पाडली आहे. तर लिखाण स्नेहल तरडे यांनी केले आहे.
मुळातच यशस्वी ठरलेलं बाहुबली मराठी चित्रपटाचं संगीत, त्यातल्या एकेका भावनेला, शब्दाला न्याय देत मराठमोळं करण्याचं अवघड काम कौशल इनामदार यांनी लीलया पार पाडलं आहे. वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे या गीतकारांची त्यांना सोबत मिळाली आहे. अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, बेला शेंडे यांसारख्या दिग्गज  गायकांनी ही गाणी स्वरबद्ध केली आहेत. केवळ शब्दशः गाणी नाही तर समग्र अनुभव मराठी भाषेत सादर करण्याचा यशस्वी प्रयोग या टीमने केला आहे. या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे चित्रपट केवळ अनुवादित न वाटता अस्सल मराठी मातीतला भासतो.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!