कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून असंघटित कामगारांचे जीवन फुलविणार

Spread the love


      
• ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
कोल्हापूर • प्रतिनिधी
      विविध कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील असंघटित व असुरक्षित कामगारांच्या जीवनात आनंद फुलविणार, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यासाठी शेतमजुरांसह ऊसतोड कामगार, यंत्रमाग कामगार, ड्रायव्हराचे महामंडळ व घरेलू कामगारांचे महामंडळ अशी विविध महामंडळे स्थापन करणार आहोत, असेही ते म्हणाले.               
      हिरलगे (ता. गडहिंग्लज) येथे ११ कोटींच्या विकासकामांचा लोकार्पण व प्रारंभ असा संयुक्त कार्यक्रम झाला. याप्रसंगी मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील अध्यक्षस्थानी होते. जिल्हा मजूर संघाचे माजी अध्यक्ष उदय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
       मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या अकरा कोटी लोकसंख्येपैकी तब्बल साडेचार कोटी लोक कामगार या संज्ञेखाली येतात. त्यापैकी केवळ ८० लाख कामगार संघटित व संरक्षित आहेत. उर्वरित चार कोटी कामगारांना कोणतेही संरक्षण नाही. या सर्वांसाठी कल्याणकारी महामंडळे स्थापन करणार आहोत. या असंघटित कामगारांच्या जीवनात आनंद फुलविणार आहोत.
       ते पुढे म्हणाले, गेल्या तीस-पस्तीस वर्षांच्या राजकीय व सामाजिक जीवनात सार्वजनिक विकासकामे डोंगराएवढी केलीच. परंतु, व्यक्तिगत कामे व्हावीत अशा सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी सरकारी योजना जनतेच्या घरा- दारापर्यंत पोचविल्या. आजपर्यंत जनतेने दिलेल्या सत्तेच्या माध्यमातून गरीब माणूस नजरेआड होऊ दिला नाही. मंत्रीपदाच्या मिळालेल्या प्रत्येक संधीत गोरगरीबांचे कल्याण शोधले, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.   
        सतीश पाटील म्हणाले की, हिरलगे गावाशी ऋणानुबंध वेगळे आहेत. विकासात हिरलगे गाव मागे राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. यावेळी उदय जोशी यांचेही भाषण झाले.
       उदय घाटगे यांनी स्वागत केले. सरपंच सचिन देसाई यांनी प्रास्ताविकात गावात आदर्शवत असे काम सुरु असल्याचे सांगितले. दहा कोटींच्या नवीन कामांची त्यांनी मागणी केली.
        यावेळी मिलिंद मगदूम, तानाजी राणगे, शहाजी पाटील, सदानंद पाटील, बंटी पाटील, आनंदा पाटील, उषा मांगले, संजय गाडे, विक्रम देसाई, सुदाम भोईटे, उपसरपंच संदीप कुंभार, शंकर लोखंडे, अश्विन यादव, अनिता शिंदे, संगीता कुंभार, कमल देसाई, श्वेता देसाई, अंजना कुपेकर, भीमराव पाटील, सुधाकर देसाई, गोविंद शिंदे, दत्ताजी देसाई, शशिकांत यादव आदी उपस्थित होते.            
नंदकुमार देसाई यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!