शिवाजी विद्यापीठाची मुख्य अभ्यासिका, स्टडी सेंटर विद्यार्थ्यांसाठी खुले

Spread the love

• ५० टक्के प्रवेश; दोन्ही लसी झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक
कोल्हापूर • प्रतिनिधी
     शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे मुख्य अभ्यासिका व स्टडी सेंटर अभ्यासिका  बुधवार, दि.२२ सप्टेंबरपासून ५० टक्के उपस्थिती व शासनाच्या कोविडविषयक नियमावलीच्या अधीन राहून विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्यात येत आहेत, असे संचालक डॉ. नमिता खोत यांनी कळविले आहे. सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.०० वा. पर्यंत कार्यालयीन वेळेत अभ्यासिका खुल्या राहतील.
     शासनाचे नियम / जिल्हा प्रशासन / विद्यापीठ प्रशासन यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या कोविड-१९ बाबतच्या आदेशांचे पालन करणे संबंधित विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे. अभ्यासिकेत बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण होऊन चौदा दिवस झाल्याची खातरजमा करण्यासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे.
    शैक्षणिक वर्षातील २०२०-२१ या वर्षातील प्रवेशित पदव्युत्तर विद्यार्थी, एम.फिल., पीएच.डी. व संशोधक विद्यार्थ्यांकडे ज्ञानस्रोत केंद्राचे /स्टडी सेंटर विभागाचे चालू वर्षीय ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मुख्य अभ्यासिका व स्टडी सेंटर अभ्यासिकेची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.०० वा. पर्यंत असेल. तसेच, कार्यालयीन सुट्टीदिवशी, प्रत्येक रविवारी, दुसरा व चौथा शनिवार दोन्ही अभ्यासिका पूर्णपणे बंद राहतील. महाराष्ट्र शासन/ जिल्हा प्रशासन/विद्यापीठ प्रशासन नियमानुसार पन्नास टक्के विद्यार्थ्यांनाच मुख्य अभ्यासिकेत प्रवेश दिला जाईल. अभ्यासिकेत विद्यार्थ्यांनी योग्य शारीरिक सुरक्षित अंतराबाबतचे (फिजिकल डिस्टन्स) नियम पाळून बसावे, असे आवाहनही संचालक डॉ. खोत यांनी केले आहे.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!