‘गुल्हर’ चित्रपट ८ एप्रिलला प्रदर्शित होणार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी 
      देश – विदेशातील पुरस्कारांमध्ये बाजी मारून उत्सुकता जागवणारा ‘गुल्हर’ हा चित्रपट ८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
      रसिकांचे लक्ष वेधून घेणारं शीर्षक आणि त्या अनुषंगाने सादर केले जाणारे कथानक ही काही मराठी चित्रपटांची खासियतच बनली आहे. अशाच चित्रपटांपैकी एक असलेला ‘गुल्हर’ने मागील बऱ्याच दिवसांपासून रसिकांसोबतच संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये कुतूहल जागवण्याचे काम केले आहे. बर्‍याच देश-विदेशातील पुरस्कारांमध्ये बाजी मारलेला  ‘गुल्हर’ हा चित्रपट ८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.
     ‘गुल्हर’ची निर्मिती शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे आणि अबिद सय्यद यांनी आयडियल व्हेंचरच्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक रमेश चौधरी यांनी पुन्हा एकदा काहीसा आव्हानात्मक चित्रपट बनवण्याचे धाडस केले आहे. प्रवाहापेक्षा वेगळं कथानक असणारा हा चित्रपट बऱ्याच वैशिष्ट्यांनी सजला आहे.
     या चित्रपटाचे कथानक धनगर समाजातील एका ११ वर्षांच्या मुलाभोवती गुंफण्यात आले असून, त्याच्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांना एक छानशी गोष्ट पहायला मिळणार आहे. चित्रपटातील संवाद आणि बोलीभाषा मनावर ठसणारी आहे. यातील लोकेशन्स यापूर्वी कधीही कोणत्या चित्रपटात पाहण्यात आलेली नसल्याने त्यातील नावीन्य नक्कीच प्रेक्षकांच्या नजरेत भरणारे आहे. यातील प्रत्येक कॅरेक्टरचा लुक खूप वेगळा असून, कथानकात प्रत्येकाला वाव देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. त्यामुळे यातील अगदी लहानातील लहान व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी ठरेल.
       यातील गाण्याचा बाजही काहीसा निराळा असून, ‘लहर आली, लहर आली गं…’ हे अजय गोगावलेंच्या आवाजातील सुरेल गाणे संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेणारे आहे. टायटल रोलमध्ये असलेल्या बाल कलाकारापासून सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम अभिनय करत चित्रपटात जीव ओतला आहे.
       रमेश चौधरी दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटात विनायक पोद्दार, रवी काळे, भार्गवी चिरमुले, सुरेश विश्वकर्मा, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर, गणेश कोकाटे, कपिल कदम, पुष्पा चौधरी, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत, स्वप्निल लांडगे, रेश्मा फडतरे, सचिन माळवदे, देवेंद्र वायाळ आदी कलाकारांनी अभिनय केला आहे.
       ‘गुल्हर’ची कथा मोहन पडवळ यांनी लिहिली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. वैभव कुलकर्णी यांनी गाणी लिहिली आहेत. संगीतकार पद्मनाथ गायकवाड यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!