“दुसऱ्याचं भलं चिंता, भरभराट आपोआपच होईल”

Spread the love

• सद्गुरु वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हाददादा पै यांची प्रेरणा
कोल्हापूर • प्रतिनिधी
      जीवन जगण्याच्या कलेत विचारांचे परिवर्तन महत्त्वाचे आहे. दुसऱ्याचं भलं चिंता म्हणजे तुमचीही भरभराट आपोआपच होईल, अशी प्रेरणा सद्गुरु वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हादादा पै यांनी दिली.
      व्हन्नुर (ता.कागल जि.कोल्हापूर) येथे महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग व जीवनविद्या मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसमृद्धी अभियानाचा प्रारंभ झाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व्हन्नूरमध्ये या अभियानाची सुरुवात झाली. व्हन्नूर ग्रामपंचायतीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
      प्रल्हाददादा पै म्हणाले की, बालसंस्कार, युवा संस्कार व महिलांना समृद्ध बनवण्याच्या दृष्टीने जीवनविद्या मिशनचे अभियान सुरू होते. आता आम्हांला ग्रामविकास विभागाची शासकीय ताकद या अभियानाला मिळाली आहे. त्यामुळे हे काम संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही अधिक जोमाने करु.
       पै म्हणाले की, आपणा सर्वांमध्ये एकच चैतन्यशक्ती आहे. त्यामुळे मने जोडली जातात. सद्गुरू वामनराव पै यांनी सर्वजण सुखी झाली तर मीही सुखी होईल, हा विचार मांडला. पक्ष-जात, धर्म-भेद नसलेली मानवी कल्याणाचे शुभचिंतन करीत राहूया.
       ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जीवनविद्या मिशनला शासनाची सहयोगी संस्था म्हणून ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. या अभियानांतर्गत राज्यातील काही गावे दत्तक घेऊन विचारांचे आदान-प्रदान होईल. याअंतर्गत स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, हागणदारीमुक्त गाव, घनकचरा व्यवस्थापन, महिलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, वृक्षारोपण, समाज प्रबोधन, राष्ट्रभक्ती अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. जीवनविद्या मिशन संस्थेच्या पाठीशी महाराष्ट्र शासन हिमालयासारखे उभे राहील.
       मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जीवनविद्या मिशनची “हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे…..”  ही प्रार्थना जगाला मानवजातीच्या कल्याणाची संदेश देणारी आहे. या मिशनच्या उपक्रमांमध्ये प्रत्येकाच्या जीवनात आनंद फुलवण्यासह गावेच्या गावे सुखी व  समृद्ध होतील.
      यावेळी सरपंच सौ पूजा रणजीत मोरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, आनंदराव राणे, आनंद राणे, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांचीही मनोगते झाली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!