कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर शहरास मंजूर केलेल्या कोट्यावधींच्या निधीबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी सत्कार केला. त्याप्रसंगी बोलताना मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर शहरास वरदहस्त लाभला आहे. त्यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या वर्षभरात कोल्हापूर शहरास कोट्यावधींचा निधी प्राप्त झाला आहे. शहराचा विकास करण्याचे ध्येय शिवसेनेने आखले असून, मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यास पाठबळ मिळत आहे. त्यामुळे त्यांचा यथोचित सत्कार व्हावा, अशी भावना शिवसैनिकांसह शहरवासियांच्या मनात होती. मंत्री एकनाथ शिंदे यांचा बुधवारी वाढदिवस होता. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर असताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावतीने मंत्री एकनाथ शिंदे यांचा चांदीची तलवार व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी हद्दवाढ, घरफाळा घोटाळा, गाळेधारकांचा प्रश्न आदी प्रमुख प्रश्न मार्गी लावण्याबाबत राजेश क्षीरसागर यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली. तसेच कोल्हापूर शहरास मंजूर केलेल्या निधीबाबत आभार मानले. कोल्हापूर महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न कमी असून, ते वाढविण्यासाठी हद्दवाढ महत्वाची आहे. यासह कोल्हापूर महानगरपालिकेच्या हक्काच्या उत्पन्नावर डल्ला मारणाऱ्या घरफाळा घोटाळ्याची चौकशी होवून दोषींवर कारवाई व्हावी. यासह महानगरपालिकेच्या गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय द्यावा, या संदर्भात मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करावे, अशा प्रमुख मागण्याही राजेश क्षीरसागर यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या.
यावेळी बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी, नगरविकास मंत्री म्हणून कोल्हापूर शहरास न्याय देण्याकरिता आपण कटिबद्ध आहोत. मंजूर निधीतून शहराचा कायापालट होईलच, यासह शहरातील प्रमुख प्रश्न लवकरच मार्गी लावण्याबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेवू, असे आश्वासित केले.
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, शिवसेना सहसंपर्कप्रमुख खासदार प्रा.संजय मंडलिक, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे आदी उपस्थित होते.