मनपाच्या प्रत्येक प्रकल्पाच्या नियोजनासाठी प्रभारी प्रकल्प अधिकारी नियुक्त करावेत

Spread the love

• राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका आयुक्तांना सुचना
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. पाठपुरावा करून निधी मंजूर केला जात असताना मिळालेल्या निधीतून विकासकामे तातडीने होताना दिसत नाहीत. त्यामुळे निधी परत जाण्याची शक्यता निर्माण होते. अशाने शहराचा विकास खुंटणार असून महानगरपालिका अधिकाऱ्यांनी कामाची क्षमता वाढवावी, मंजूर झालेले प्रकल्प पूर्ण करण्याकरिता प्रत्येक प्रकल्पाच्या नियोजनासाठी व देखरेखीसाठी स्वतंत्र प्रभारी प्रकल्प अधिकारी नियुक्त करावेत, अशा सुचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांना दिल्या. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास विविध योजना व प्रकल्पांसाठी मंजूर  झालेल्या निधीसंदर्भात कोल्हापूर महानगरपालिका येथे आढावा बैठक पार पडली.
    यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर, कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्ग असणाऱ्या आखरी रास्ताचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. या रस्त्याचे अर्धे काम पूर्णत्वास आले आहे. उर्वरित रस्त्याच्या कामाची प्रक्रिया पार पडलेली नाही. त्यामुळे हा रस्ता अपूर्णच राहिला असून, भागातील नागरिकांना खड्यांचा आणि धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उर्वरित रस्त्याचे काम महानगरपालिका प्रशासनाने स्वनिधीतून तात्काळ करावे. यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक व क्रीडासंकुलाचा आराखडा तयार असून, याकरिता जिल्हा नियोजन समितीमधून रु.५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित रु.१० कोटी निधीस लवकरच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजुरी मिळेल. पण, या प्रकल्पाचेही काम आजतागायत कागदोपत्रीच असल्याचे दिसते. त्यामुळे तात्काळ मंजुर निधीमधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक व क्रीडासंकुलाचे काम तात्काळ सुरु करावे, अशा सुचना दिल्या. यासह शहरातील गांधी मैदानाच्या प्रश्नावरही सुचना केली.
     ऐतिहासिक रंकाळा तलावास रु.१५ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यातील रु.१० कोटी निधीस १०० टक्के अनुदानासह नगरविकास विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. परंतु, या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या नसून, निधी असूनही विकास कामे थांबल्याचे चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे तातडीने रंकाळा तलाव सुशोभिकरण आणि संवर्धन आराखड्यानुसार कामाच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांना रु.२०३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. परंतु, त्याचाही प्रस्तावही प्रशासनाकडून सादर करण्यात आलेला नाही, याबाबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विचारणा केली.
     यावर बोलताना आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी, या योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेस ३० टक्के स्वहिस्सा द्यावा लागणार असून, महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्याचे सांगितले.
     यावर बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, या योजनेअंतर्गत “ड” वर्ग महानगरपालिकांना ३० टक्के स्वहिस्सा देणे अनिवार्य असून, त्याशिवाय ठोक निधीची तरतूद शासनाकडून केली जात नसल्याचे सांगितले.
      यावेळी शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगेल, नंदकुमार मोरे, ऋतुराज क्षीरसागर, किशोर घाटगे, निलेश हंकारे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, कार्यकारी अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, संजय सरनाईक यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!