युरो कप फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी आजपासून

Spread the love

• आज रात्री स्वित्झर्लंड विरूद्ध स्पेन सामना
कोल्हापूर • प्रतिनिधी
     युरोपियन देशात सुरु असलेली युरो कप फुटबॉल स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. साखळी आणि बाद फेरीनंतर आजपासून उपांत्यपूर्व फेरीचे  सामने सुरू होत आहेत. आज (दि.२) रात्री ९:३० वाजता स्वित्झर्लंड विरूद्ध स्पेन तर त्यानंतर (दि.३) मध्यरात्री १२:३० वाजता बेल्जियम विरूद्ध इटली सामना होईल. यंदाच्या स्पर्धेत काही नवे संघ, जे मागील बरेच वर्ष उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचले नव्हते ते संघ पोहोचले असल्याने स्पर्धेतील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
     युरो कप फुटबॉल स्पर्धेला १२ जूनपासून सुरूवात झाली. साखळी आणि बाद फेरीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करून आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. स्वित्झर्लंड, स्पेन, बेल्जियम, इटली, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, युक्रेन आणि इंग्लंड हे संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत.
      यंदाच्या युरो कप फुटबॉल स्पर्धेत अनेक  अनपेक्षित असे निकाल लागले आहेत. बाद फेरीच्या सामन्यात गतविजेते पोर्तुगाल, विश्वविजेते फ्रान्स व जर्मनी अशा दिग्गज संघाना पराभवास सामोरे जावे लागले असून युक्रेन, स्वित्झर्लंडसारखे संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. स्वित्झर्लंड, स्पेन, बेल्जियम, इटली, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, युक्रेन व इंग्लंड या आठ संघात उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले जातील आणि त्यातील चार विजयी संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.
               उपांत्यपूर्व फेरीचे सामने…….
• दि.२: स्वित्झर्लंड वि. स्पेन – रात्री ९:३० – सेंट पीटर्सबर्ग.
• दि.३: बेल्जियम वि. इटली – मध्यरात्री १२:३० – म्युनिक. 
• दि.३: झेक प्रजासत्ताक वि. डेन्मार्क – रात्री ९:३० बाकू. 
• दि.४: युक्रेन वि. इंग्लंड – मध्यरात्री १२:३० – रोम.
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!