• ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान होणार सामने
कोल्हापूर • प्रतिनिधी
महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील स्थगित करण्यात आलेले सामने विनाप्रेक्षक व कोविड-१९ बाबतचे सर्व नियम व अटी यांची पुर्तता करुन ११ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियमवर घेण्यात येणार आहेत. कोविड – १९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करुन स्थगित करण्यात आलेले सामने खेळविण्यात येणार आहेत. सदरचे सामने विनाप्रेक्षक असल्यामुळे फुटबॉल प्रेक्षकांसाठी युटयुब चॅनेलच्या VIEWFINDER MEDIA या लिंकवर लाईव्ह दाखविण्यात येणार आहेत.
कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशने जिल्हाधिकारी यांचेकडून कोविड-१९ व ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संदर्भात जाहिर केलेल्या निर्बंधाचे पालन करण्याचे अटीवरच सदर स्पर्धा घेण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे. महापौर चषक फुटबॉल स्पर्धातील स्थगित करण्यात आलेले सामने विनाप्रेक्षक व कोविड-१९ बाबतचे सर्व नियम व अटी यांची पुर्तता करुन ११ ते १३ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पाडण्यात येणार आहेत. प्रॅक्टीस फुटबॉल क्लबने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यामध्ये शुक्रवारी (दि.११) दिलबहार तालीम मंडळ (अ) विरुध्द फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यामधील उपांत्य सामना होणार आहे. अंतिम सामना रविवारी (दि.१३) प्रॅक्टीस फुटबॉल क्लब विरुध्द दिलबहार तालीम मंडळ (अ) – फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यातील विजयी संघासोबत होणार आहे. सर्व सामने कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन यांच्या नियमानुसार होतील. शनिवारी, (दि.१२) लोकप्रतिनिधी विरुध्द प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण सामना खेळविण्यात येणार आहे. अंतिम सामना झाल्यानंतर तात्काळ बक्षिस वितरणाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
फुटबॉल खेळाला तसेच खेळाडूंना चालना देण्याकरिता कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने दि. ४ ते १५ मार्च २०२० या कालावधीत महापौर चषक फुटबॉल स्पर्धचे आयोजन केले होते. या स्पर्धतील उपांत्यपूर्व सर्व सामने खेळविण्यात आले होते. परंतु देशासह राज्यामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या बंदी आदेशामुळे महापौर चषक फुटबॉल स्पर्धामधील एक उपांत्य सामना, तृतीय क्रमांक सामना व अंतिम सामना दि. १३ मार्च २०२०पासून स्थगित करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी स्पर्धात्मक खेळासाठी बंदिस्त किंवा खुल्या ठिकाणी होणाऱ्या व बैठक व्यवस्था असणाऱ्या किंवा नसणाऱ्या ठिकाणी आसन क्षमतेच्या २५ टक्के किंवा २०० व्यक्ती यापैकी जी संख्या कमी असेल त्यास परवानगी असेल्याचे सुधारित आदेश पारित केले आहेत, त्यानुसार महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील उर्वरित सामने खेळले जातील. या स्पर्धेस खेळाडू संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, फिजिओथेरफिस्ट, पंच, मॅच कनिशनर, रेफ्रि असेसर व कर्मचारी यांचे कोवीड-१९ चे दोन लसीकरणाचे डोस असणे बंधनकारक आहे. जर नसलेस ४८ तासाचा आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. त्याशिवाय क्रिडांगणावर प्रवेश दिला जाणार नाही. सदरची स्पर्धा हि विनाप्रेक्षक असल्यामुळे फुटबॉल प्रेक्षकांसाठी युटयुब चॅनेलच्या VIEWFINDER MEDIA या लिंकवर लाईव्ह दाखविण्यात येणार आहे.
——————————————————-