चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्याचा आनंद मोठा: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Spread the love

• कागलमध्ये रोगमुक्त बालकांचा सत्कार सोहळा उत्साहात
कोल्हापूर • प्रतिनिधी
     आयुष्याच्या सुरुवातीलाच हृदयरोगासह दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्यच लोपलेले असते. आजारामुळे बालजीवाला लागलेल्या घरघरीमुळे संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य हरवते. यशस्वी शस्त्रक्रिया होऊन रोगमुक्त झालेल्या या चिमुकल्यांच्या चेहर्‍यावरील हास्याचा मनाला मोठा आनंद आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. छोट्या-छोट्या चिमुकल्यांच्या रोगमुक्तीच्या या सेवेचे फार मोठे आत्मिक समाधान मिळते, असेही ते म्हणाले.
     कोरोना संसर्गाच्या महामारीत लॉकडाऊन व कर्फ्यूमुळे राज्यातील मोफत वैद्यकीय उपचारांची सेवा बंद झाली होती. अलीकडेच ती सुरू झाल्यानंतर लहान मुलांवरील गंभीर आजारांच्या दीडशेहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्यासाठी रोगमुक्त चिमुकल्यांचा सत्कार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ. माणिक रमेश माळी होत्या.
     मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, लहान मुलांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याच्या आईच्या चेहर्‍यावरील आनंद हा मला हजारो पुरस्कार मिळाल्यापेक्षाही मोठा वाटतो. विधी व न्यायमंत्री असताना दवाखान्यांच्या धर्मदाय ट्रस्ट कायद्यामध्ये सुधारणा केली. गोरगरिबांवर दहा टक्के मोफत उपचार न करणाऱ्या दवाखान्यांच्या मालकांना व डॉक्टराना सहा महिने शिक्षेची तरतूद केली. त्यामुळेच, दुर्धर आजाराच्या गोरगरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवेची मोठमोठ्या दवाखान्याची दारे खुली झाली.
      मंत्री श्री. मुश्रीफ यांचा आठ वर्षाचा नातू कु.उसेद याच्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. तो म्हणाला, गोरगरीब आणि संकटग्रस्तांच्या सेवेमुळे माझ्या आजोबांच्या चेहऱ्यावर सातत्याने हास्य आणि आनंद दिसतो. गेल्या पंचवीस-तीस वर्षांत केलेल्या अफाट समाज कार्याबरोबरच हजारो जमाना दिलेल्या जीवदानाच्या पुण्याईची शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे.
      यावेळी भैय्या माने यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते बंटी सावंत, प्रज्ञा संकपाळ, सतेज किरुळकर, वजीर नायकवडी, गैबी नाईक, योगेश कांबळे यांचेही सत्कार झाले.
       रुग्ण आणि नातेवाईकांपैकी कु. ऋतुजा शशिकांत खुटवाडे (रा.तिळवणी), कु. ऋतुजा युवराज तिराळे (रा.कुरुकली), सौ. सुषमा मोहिते (रा.आरळगुंडी), सौ. विद्या सावेकर (रा.बेलवळे बुद्रुक) यांचीही मनोगते झाली. या सर्वांनी मंत्री श्री. मुश्रीफ हे आमच्यासाठी देवदूत असल्याची भावना व्यक्त केल्या. आजारातून बरे झालेली बालके आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ऋदयस्पर्शी भाषणानी उपस्थित गहिवरले.
      यावेळी नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, चंद्रकांत गवळी, सौ.सबिना साजिद मुश्रीफ, माऊली महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ.अमरिन नविद मुश्रीफ, माऊली महिला विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. नबिला अबिद मुश्रीफ, जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, पी.बी.घाटगे, प्रवीण काळबर, सौरभ पाटील, संग्राम गुरव, पद्मजा भालबर, संजय चितारी, माधवी मोरबाळे, वर्षा बन्ने, अलका मर्दाने आशाकाकी जगदाळे, जयश्री सोनुले, संजय ठाणेकर, नेताजी मोरे, बच्चन कांबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!