केएम चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत आता सुपरलिगचा थरार!

Spread the love

• शिवाजी, फुलेवाडी, दिलबहार, बालगोपाल  सुपरलिगमध्ये  
कोल्हापूर • प्रतिनिधी
       शिवाजी पेठेतील झुंजार क्लब आणि फॉर्म्युला थ्री रेसर कृष्णराज महाडिक यांच्यावतीने आयोजित के.एम. चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारपासून सुपरलिग सामन्यांचा थरार फुटबॉलप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे.
       शिवाजी तरूण मंडळ, फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ, दिलबहार तालीम मंडळ आणि बालगोपाल तालीम मंडळने सुपरलिगमध्ये प्रवेश केला आहे. या चार संघांत २२ ते २७ एप्रिलदरम्यान सुपरलिगचे सामने होतील. यातील सर्वाधिक गुण मिळविणारे दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. त्या दोन संघात जेतेपदासाठी २९ एप्रिलला लढत होईल.
        शुक्रवारी (दि.२२) सुपरलिगमध्ये शिवाजी तरूण मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यात चार वाजता सामना होईल.
       दरम्यान, गुरुवारी झालेल्या सामन्यात दिलबहारने खंडोबा तालीम मंडळवर २-० गोलने विजय मिळवला. पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत होता. उत्तरार्धात दिलबहारकडून पेनल्टीवर सचिन पाटीलने गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जावेद जमादारने ६७ व्या मिनिटास गोल करून संघाची आघाडी २-० अशी केली. अखेर पूर्णवेळेत हिच आघाडी कायम राखत दिलबहारने विजय मिळवला.
      पीटीएम आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना चुरशीचा झाला. या सामन्यात बालगोपालने पीटीएमवर ३-१ ने मात केली.
      बालगोपाल घ्या ऋतुराज पाटीलने पहिल्याच मिनिटास गोल नोंदवत सनसनाटी निर्माण केली. उत्तरार्धात सूरज जाधवने ५१व्या मिनिटास गोल करून आघाडी भक्कम केली. पीटीएमकडून ऋषिकेश मेथे-पाटीलने ५८व्या मिनिटास गोल नोंदवून आघाडी कमी केली परंतु बालगोपालच्या प्रतिक पोवारने ७२ मिनिटास गोल संघाला ३-१ अशा आघाडीवर नेले. अखेर हिच आघाडी कायम राखत बालगोपालने  विजयावर शिक्कामोर्तब केले. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!