‘
कोल्हापूर • प्रतिनिधी
अधिकाधिक उत्तम काम करण्यासाठी ‘द अनबिटेबल’ हे पुस्तक प्रवृत्त करते. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी ते आवर्जून वाचायला हवे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी केले.
प्रेरक वक्ते म्हणून लोकप्रिय असणारे वाठार येथील डॉ. अजय मस्के आणि अश्विनी कांबळे यांनी लिहिलेल्या ‘द अनबिटेबल: एन एनलाइटन्ड पिक परफॉर्मर’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी तुरची-तासगाव येथील महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्रमुख पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. मनिषा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘द अनबिटेबल’ पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉ. मस्के यांच्या स्वतःच्या अनुभवांतून ते आले आहे. अनुभवांतून आल्यामुळे त्याची विश्वासार्हता वाढली आहे आणि त्यांची प्रचिती घेता येऊ शकते. अंगिकृत कोणतेही काम एखादा उत्तम करीतच असतो, पण ते त्याहूनही अधिक चांगले करता येऊ शकते, हे सांगून त्या दिशेने जाण्यास हे पुस्तक वाचकाला प्रवृत्त करते. डॉ. मस्के यांनी विद्यार्थ्यांमधील रोजगाराभिमुखता वाढविण्यासाठी आणि त्यांना रोजगार प्रदान करण्यासाठी ते करीत असलेल्या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर,विजयसिंह माने यांनी पुस्तकाच्या यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास मान्यवर उपस्थित होते. कौस्तुभ बारवडे यांनी स्वागत केले. अश्विनी कांबळे यांनी पुस्तक परिचय करून दिला तर डॉ. अजय मस्के यांनी आभार मानले.
———————————————–