सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याची एकरकमी एफआरपी २,९६० रुपये

• ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
कोल्हापूर • प्रतिनिधी
     सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २,९६० रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कारखान्याच्या  कामगारांना येत्या एक जानेवारीपासून वेजबोर्डही लागू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
     कारखान्याच्या सातव्या गळीत हंगाम शुभारंभात मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे ज्येष्ठ संचालक गणपतराव फराकटे होते.
     मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, एकरकमी एफआरपी देणे ही शेतकऱ्यांवर मेहरबानी नव्हे तर आमचे आद्य कर्तव्यच आहे. त्यामुळे, कोणीही टिमकी वाजवण्याची गरज नाही. आंबेओहळ प्रकल्प पूर्ण झाला आहे. लवकरच नागणवाडी प्रकल्पही पूर्ण होईल. त्यानंतर कारखाना कार्यक्षेत्रातच हक्काचा ऊस पिकेल. त्यामुळे, येत्या एक-दोन वर्षातच गाळप क्षमता दहा लाख टन, पन्नास मेगावॅट वीजनिर्मिती व दररोज एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती अशी विस्तार वाढ करणारच.
     या हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपासह ११ कोटी युनिट वीजनिर्मिती, सव्वा कोटी लिटर इथेनॉल व ५० लाख लिटर रेक्टिफाईड स्पिरिट अशी उद्दिष्टे असल्याचेही ते म्हणाले.
     केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने यांनी मनोगत व्यक्त केले. कारखान्याचे कर्मचारी संजय मारुती पाटील (रा.भडगाव) यांनी एक महिन्याचा पगार मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या न्यायालयीन दाव्याच्या खर्चासाठी दिला.
     व्यासपीठावर जि. प. सदस्य सर्वश्री युवराज पाटील, सतीश पाटील, मनोजभाऊ फराकटे, माजी उपसभापती शशिकांत खोत, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले, विकास पाटील, सूर्याजी घोरपडे, पंचायत समिती सदस्य जयदीप पोवार, डी. एम. चौगुले, बिद्रीचे संचालक जगदीश पाटील, निलेश शिंदे, रवी परीट, नेताजी मोरे, दिनकरराव कोतेकर, रणजीत सूर्यवंशी, प्रा. डी. डी. चौगुले, बाळासाहेब तुरंबे, शिरीष देसाई, मारुतराव घोरपडे, नारायण पाटील, दत्ता पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
     स्वागतपर भाषणात अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी कारखान्याच्या गेल्या सहा हंगामाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. प्रास्ताविक जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी केले. सूत्रसंचलन विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार डिस्टिलरी मॅनेजर संतोष मोरबाळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *