फुटबॉलशौकिनांची आता प्रतीक्षा संपली….

Spread the love

फुटबॉलशौकिनांची आता प्रतीक्षा संपली…..

• केएसए लिग २२ फेब्रुवारीपासून ; सामने होणार विनाप्रेक्षक
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूरचे फुटबॉलशौकिन ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या ‘केएसए लिग’ अर्थात केएसए वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. २२ फेब्रुवारीपासून स्पर्धेला प्रारंभ होत असल्याने खऱ्या अर्थाने फुटबॉल हंगामाचा किक ऑफ होईल अन् फुटबॉलशौकिनांची प्रतीक्षा संपेल. कोविड-१९च्या निर्बंधांमुळे सामने विनाप्रेक्षक होणार असल्याने तुर्तास फुटबॉलशौकिनांना मात्र सामने ऑनलाईन लिंकव्दारे पहावे लागणार आहेत.
      दरम्यान, केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत सोळा संघांमध्ये एकूण ५६ सामने होतील. २२ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता खंडोबा तालीम मंडळ (ब) विरुद्ध सम्राटनगर स्पोर्टस तर दुपारी चार वाजता प्रॅक्टीस फुटबॉल क्लब विरुद्ध बीजीएम स्पोर्टस असे सामने होतील. दररोज दोन याप्रमाणे छत्रपती शाहू स्टेडियमवर होणारे सामने विनाप्रेक्षक होतील.
       कोविड-१९ मुळे प्रशासनाने निर्बंध जाहीर केले होते, त्यामुळे कोल्हापूरात फुटबॉल स्पर्धा बंद होती. १३ मार्च २०२० रोजी महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील सामने स्थगित केले होते, ते सामने यावर्षी नुकतेच पार पडले. सुमारे दोन वर्षाने महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतील उर्वरित सामने सुरू झाल्यापासून फुटबॉल संघ, खेळाडू व फुटबॉलशौकिनांना ‘केएसए लिग’ केव्हा सुरू होणार, याची प्रतीक्षा लागली होती.
       कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन (केएसए)ने सन २०२१-२२च्या फुटबॉल हंगामासाठी वरिष्ठ गटातील संघ व खेळाडू यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली होती. तेव्हापासून फुटबॉल हंगामाची चर्चा होती. रविवारी महापौर चषक स्पर्धा पार पडली. त्यानंतर सोमवारी (दि.१४) केएसए पदाधिकारी व वरिष्ठ गटातील १६ संघांचे प्रतिनिधी यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये केएसए लिग फुटबॉल स्पर्धेच्या नियोजनाबाबत चर्चा होऊन स्पर्धा २२ फेब्रुवारीपासून घेण्याचे ठरले. यावेळी केएसएचे सचिव माणिक मंडलिक, सहसचिव राजेंद्र दळवी, फुटबॉल सचिव प्रा. अमर सासने, नितीन जाधव, संभाजीराव पाटील – मांगोरे, मनोज जाधव, दीपक राऊत  आदींसह वरिष्ठ गटातील संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
——————————————————-

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!