कोल्हापूर • प्रतिनिधी
कामगार संघटना व संघ व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ प्रकल्प येथे १ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे महाराष्ट्र राज्य आयटकचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शाम काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना कॉम्रेड शाम काळे म्हणाले कि, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेत व मुंबई शहराच्या जडणघडणीत कामगारांनी अतुलनीय योगदान दिले आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात ग्राहकांपर्यंत दूध पोहचवण्याचे काम गोकुळसारख्या संस्थेने करून एक सामाजिक बांधिलकी जपली असून या सगळ्याचे श्रेय गोकुळ दूध संघाशी संलग्न असणारे दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, वाहतूकदार व सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोकुळचा कर्मचारी वर्गाचे आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हाणाले की, एखादी संस्था मोठी करायची असेल तर त्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे योगदान फार महत्त्वाचे असते. तेथील कुशल कर्मचारी यांच्यामुळे संस्था बळकट होत असते. गोकुळच्या जडणघडणीत कर्मचाऱ्यांचे योगदान फार मोलाचे आहे.
यावेळी चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य आयटकचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शाम काळे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, रामकृष्ण पाटील, संघटना पदाधिकारी एस.बी.पाटील, शंकर पाटील,संजय सदलगेकर, सदाशिव निकम (शाहीर), संघाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.