.तर ही आहे कागलची फाईव्ह स्टार एमआयडीसी!

Spread the love

.
 कोल्हापूर • प्रतिनिधी
     कागलच्या पंचतारांकित एमआयडीसीतील मुख्य रस्त्यांची कामे आणि विद्युतीकरणाची कामे पाहून आपण भारतात आहोत की एखाद्या परदेशातील सुसज्ज नागरी वसाहतीत,  असाच भास होतो. उद्योगमंत्री सुभाष देसाई व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही चमकदार कामगिरी पूर्ण केली आहे.
      २५ कोटी रुपये खर्चून मुख्य रस्त्याच्या कामासह विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. अंतर्गत रस्त्यांची २० कोटींची कामे औद्योगिक विकास महामंडळाकडे प्रस्तावित आहेत. पावसाळ्यानंतर तातडीने ती पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. याकामी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनबलगन यांचे मोठे सहकार्य झाल्याची कृतज्ञताही मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
       याबाबत अधिक माहिती अशी, हा परिसर उद्योगविश्वाच्या दृष्टीने सुरुवातीला ग्रोथ सेंटर होता. तत्कालीन उद्योग राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी हा दर्जा दिला होता. परंतु  त्याकाळी नदीतच पाणी नसल्यामुळे अपेक्षित विकास होऊ शकला नाही. नंतर लवकरच काळम्मावाडीची पूर्तता झाली व १९९९ साली ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आमदार झाल्यानंतर या वसाहतीला पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचा दर्जा मिळविण्यात यश मिळवले.
       त्यावेळी सिद्धनेर्ली येथून दूधगंगा नदीवरून इथल्या उद्योगांसाठी पाणी आणल्यानंतर खऱ्या अर्थाने या एमआयडीसीची वाटचाल सुरु झाली. त्यावेळी सिद्धनेर्ली येथील स्वर्गीय कै. पांडुरंग दादू पाटील-आबा यांनी या पाणी योजनेच्या जॅकवेलसाठी स्वतःची जमीन दिली होती. त्या कार्यक्रमाला स्वर्गीय मंत्री पतंगराव कदम आले होते.
      आजमितीला कागल एमआयडीसीमध्ये किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेड, इंडो -काउंट इंडस्ट्रीज लिमिटेड, रेमंड लक्झरी कॉटन्स लि., घाटगे – पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड, मेट्रो हायटेक को-ऑपरेटिव्ह टेक्स्टाईल पार्क, नागरिका एक्सपोर्ट, ग्रसिम प्रीमियम फॅब्रिक्स प्रा. लि.,  सुदर्शन जीन्स प्रा. लि., अंशुल स्टील यासारख्या नामवंत कंपन्यांबरोबरच हजारो उद्योग- व्यवसाय सुरू आहेत.
       जगातील एक नंबरची औद्योगिक वसाहत…..
     स्वर्गीय मंत्री पतंगराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या त्या कार्यक्रमात हसन मुश्रीफ यांनी सांगितले होते, की ही पंचतारांकित एमआयडीसी स्वच्छ – मुबलक पाणीपुरवठा, प्रदूषण विरहित स्वच्छ – सुंदर हवा, लगतच असलेला बेंगलोर- मुंबई हा राष्ट्रीय महामार्ग, जवळचे रेल्वे स्थानक व विमानतळ यामुळे ही औद्योगिक वसाहत महाराष्ट्रातील, देशातीलच नव्हे तर जगातील एक नंबरची औद्योगिक वसाहत ठरेल.  तेवढी सुंदर औद्योगिक वसाहत आम्ही ती करूच.
          लवकरच आयटी पार्कही उभारणार…..             
     या पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या फक्त कमी आहे ती आयटी पार्कची. यासंदर्भात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि देशाचे नेते शरद पवार यांची चर्चाही झालेली आहे. टीसीएल म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी लिमिटेड, विप्रो, इन्फोसिस इत्यादी कंपन्यांशी प्राथमिक चर्चाही झालेली आहे. कोल्हापुरात नव्यानेच आलेल्या एसकेएल सारख्या कंपन्यांसह इतर कंपन्यांमधून शेकडो आयटीएन्स शिकून तयार आहेत. आयटीमध्ये शिकून अनेक मुले परदेशातही गेलेली आहेत. दरम्यान, कोरोना महामारीची जागतिक स्थिती आणि शरद पवार यांच्या आजारपणामुळे आयटी पार्क निर्मितीच्या कामाची गती थोडीशी कमी झाली असली तरी आयटी पार्कही लवकरच सुरू होणार असल्याचा विश्वास, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
        व्याप्ती कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीची…..
     कागलच्या फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये आत्तापर्यंत दीड हजारावर औद्योगिक भूखंडांचे वाटप झालेले आहे. त्यापैकी एक हजारावर भूखंडांवर उद्योग व व्यवसाय सुरू आहेत. उर्वरित पाचशे भूखंडांवर उद्योजक उद्योग- व्यवसाय सुरु करण्याच्या प्रक्रियेत आहेत. संपूर्ण एमआयडीसीत ४० हजारावर कायमस्वरूपी नोकरीवरील कामगार,  १२ हजारावर कंत्राटी स्वरूपावरील कामगार व आठ हजारावर रोजंदारीवरील कामगार कार्यरत आहेत.
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!