१८,१६,१४,१२ व १० वर्षांखालील मुला-मुलींच्या राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा यावर्षी ऑनलाईन


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या वतीने १८, १६, १४, १२ व १० वर्षांखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
     कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी सर्व वयोगटातील व खुल्या निवड बुद्धिबळ स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. यावर्षीच्या सर्व स्पर्धा नेहमीसारख्या होतील असे वाटत होते, परंतु मार्चपासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे व परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता कमी वाटल्यामुळे जागतिक बुद्धिबळ संघटनेने या विविध वयोगटातील जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जुलैमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निश्चित केले.
     त्यानुषंगाने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेनेही या सर्व निवड स्पर्धा १० जूनपासून घेण्याची निश्चित केले व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनाही १८, १६, १४, १२ व १० वर्षांखालील मुला-मुलींच्या ऑनलाईन निवड बुद्धिबळ स्पर्धा ३ जूनपासून सुरू करत आहे.
     या पाच गटातील बुद्धिबळ स्पर्धा मुले व मुलींच्या स्वतंत्र गटात स्पर्धा घेण्यात येणार आहेत, म्हणजे एकूण दहा गटात या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा स्विस् लीगच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण नऊ फेऱ्यात ऑनलाईनने टॉर्नेलो या संकेतस्थळावर होणार आहेत.
      प्रत्येक गटातील स्पर्धा तीन दिवस चालणार आहे. दररोज तीन फेऱ्या प्रमाणे एकूण नऊ फेऱ्या स्विस लीग पद्धतीने होणार आहेत. प्रथम १८ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा ३ ते ५ जून दरम्यान होणार आहे. १६ वर्षाखालील मुलांची व मुलींची स्पर्धा ६ ते ८ जून दरम्यान होणार आहे. १४ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा ९ ते ११ जून दरम्यान होणार आहेत. १२ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा १२ ते १४ जून दरम्यान होणार आहेत. तर शेवटी १० वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा १५ ते १७ जून दरम्यान होणार आहेत.
      दहा गटातील प्रत्येक गटात रोख बक्षिसे पहिल्या पंधरा क्रमांकांना दिली जाणार आहेत. सर्व दहा गटात मिळून एकूण बक्षिसाची रक्कम दोन लाख पन्नास हजार रुपये आहे.
      स्पर्धेत भाग घेणाऱ्या इच्छुक बुद्धिबळपटूस प्रत्येकी सहाशे रुपये प्रवेश फी ठेवली आहे. प्रवेश फी ऑनलाईनने खालील संकेतस्थळावर फार्मसह भरावी. www.chezzcircle.com/events  प्रत्येक खेळाडूंनी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे २५० रूपये भरुन खेळाडू रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा टॉर्नेलो या संकेत स्थळावर होणार आहे भाग घेण्याऱ्या खेळाडूंनी https://www.tornelo.com या संकेत स्थळावर जाऊन आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
      अधिक माहितीसाठी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले कोल्हापूर, मंगेश गंभीरे नाशिक, प्रवीण ठाकरे जळगाव, विलास म्हात्रे अलिबाग, सच्चिदानंद सोमण नागपूर, अंकुश रक्ताडे बुलढाणा, प्रकाश भिलारे मुंबई, सलील घाटे ठाणे, सुमुख गायकवाड सोलापूर, मनीष मारुलकर कोल्हापूर, चंद्रकांत वळवडे सांगली, हेमेंद्र पटेल औरंगाबाद  यांच्याशी संपर्क साधावा, असे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर व सचिव निरंजन गोडबोले यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
———————————————– ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *