लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानतर्फे यंदा शाहू जयंती साधेपणाने होणार

• रमेश जाधव व प्रिया पाटील यांना “जीवनगौरव पुरस्कार”
कोल्हापूर • प्रतिनिधी
     लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची २६ जून रोजी जयंती आहे.  कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर यंदा राजर्षी शाहू जयंती साधेपणाने साजरी करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पैलवान बाबा महाडिक व उपाध्यक्ष हिंदुराव हुजरे – पाटील यांनी दिली.
     दरम्यान, प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा “लोकराजा राजर्षी शाहू जीवनगौरव पुरस्कार” यावर्षी लोकराजा राजर्षी शाहू मालिकेचे लेखक, अभ्यासक व इतिहास संशोधक रमेश जाधव तसेच शववाहिकेचे सारथ्य करून कोविड काळात मोलाचं योगदान देणारी २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनी कु. प्रिया पाटील यांना जाहीर करण्यात आला.
     ते म्हणाले की, लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानतर्फे कोल्हापूरातील सर्व ८५ तालीम एकत्रितपणे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू महाराज यांची १४७ वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात येणार आहे. कोरोना संबंधित असलेल्या शासकीय नियमांचे पालन करून २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजता बिंदू चौक येथे मोजक्याच प्रतिनिधींच्यावतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे.
     लोकराजा छत्रपती राजर्षी शाहूंच्या जीवन आणि कार्यावरती ज्या मान्यवरांनी आजपर्यंत काम केले आहे, अशा व्यक्तींना “लोकराजा राजर्षी शाहू जीवनगौरव पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार लोकराजा राजर्षी शाहू मालिकेचे लेखक, अभ्यासक व इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव तसेच कोविड काळात शववाहिकेचे सारथ्य करून मोलाचं योगदान देणाऱ्या कु. प्रिया पाटील यांना देण्यात येणार आहे. कोविड विषाणूचा प्रादुर्भाव कमी होऊन जनजीवन सुरळीत झाल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा होईल. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती हिंदुराव हुजरे – पाटील यांनी दिली.
     पत्रकार परिषदेस प्रतिष्ठानचे सचिव मदन पाटील, राजू सावंत, उज्वल नागेशकर व इतिहास अभ्यासक राम यादव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *