शिवाजी विद्यापीठाचा यंदाचा आविष्कार संशोधन महोत्सव ऑनलाईन

Spread the love

• ९ फेब्रुवारीपर्यंत नोंदणीचे आवाहन
कोल्हापूर • प्रतिनिधी
      शिवाजी विद्यापीठामार्फत ‘आविष्कार संशोधन महोत्सव २०२१-२२’चे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक आपले संशोधन सादर करू शकतात. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी हा महोत्सव ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येणार आहे. नोंदणी करण्याची अंतिम तारीख ९ फेब्रुवारी २०२२ आहे, अशी माहिती समन्वयक डॉ. एस. बी. महाडिक यांनी दिली आहे.
      डॉ. महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महोत्सवात सहभागाचे चार स्तर आहेत: १) पदवी (UG) २) पदव्युत्तर (PG) ३) एम.फिल./ पीएच.डी. साठी प्रवेशित असणारे विद्यार्थी (PPG) आणि ४) एम.फिल./ पीएच. डी. साठी प्रवेशित असणारे महाविद्यालयीन व विद्यापीठीय मान्यताप्राप्त शिक्षक (TH).
       महोत्सवामध्ये सादर करण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांची विभागणी सहा शाखांमध्ये करण्यात येणार आहे: १) मानव्यविद्या, भाषा, ललितकला २) वाणिज्य, व्यवस्थापन, कायदा ३) केवल विज्ञान ४) कृषी व पशुपालन ५) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि ६) वैद्यक व औषध निर्माण. विद्यार्थी/ शिक्षक यांची कोणतीही शाखा असली तरी ते अन्य शाखेअंतर्गतही संशोधन सादर करू शकतात.
      पदवी स्तरासाठी (UG) प्रथम फेरी जिल्हास्तरावर घेण्यात येईल. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी या फेरीचे आयोजन अनुक्रमे दि न्यू कॉलेज (कोल्हापूर), विलिंग्डन कॉलेज (सांगली) व दहिवडी कॉलेज (दहिवडी) या यजमान महाविद्यालयांमार्फत आयोजित करण्यात आले आहे. प्रथम फेरीतून निवडलेल्या पदवी स्तरातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठस्तरीय फेरीचे आयोजन संगणकशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेमार्फत आयोजित करण्यात आले आहे. इतर तीन स्तरांसाठी (PG/PPG/TH) महोत्सव थेट विद्यापीठ स्तरावरच संगणकशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेमार्फत आयोजित करण्यात आला आहे.
      या महोत्सवामध्ये एका महाविद्यालयातून/अधिविभागातून प्रत्येक शाखेसाठी व प्रत्येक स्तरामध्ये जास्तीत जास्त दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात आणि त्याची नोंदणी संबंधित महाविद्यालय/अधिविभाग यांनी विद्यापीठाने उपलब्ध केलेला गुगल फॉर्मच्या माध्यमातून करावयाची आहे. महाविद्यालयांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची नोंदणी विद्यापीठाने महाविद्यालयाला दिलेल्या अधिकृत ई-मेलद्वारेच करावयाची आहे. विद्यार्थी वैयक्तिकरित्या नोंदणी करू शकणार नाहीत.
      नोंदणी करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रकल्पाची एक पानी संक्षिप्त माहिती (PDF format) आणि प्रकल्प सादरीकरणाचा ३ ते ५ मिनिटांचा व कमाल १ जीबी मर्यादेचा व्हिडिओ अपलोड करणे आवश्यक आहे. सदर एक पानी माहिती व व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांच्या अगर त्यांच्या महाविद्यालयाच्या/ अधिविभागाच्या नावाचा उल्लेख नसावा. नोंदणीसाठीची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (www.unishivaji.ac.in/bcud/Avishkar) उपलब्ध करण्यात येणार आहे.
      या महोत्सवामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील यांनी केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!