उद्यापासून सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचा थरार!

Spread the love

• छत्रपती शाहू स्टेडियमवर ३ ते १५ मे या कालावधीत स्पर्धा
कोल्हापूर • प्रतिनिधी
     पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी.वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कै.पांडबा जाधव व कै.रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ “सतेज चषक – २०२२” या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर ३ ते १५ मे या कालावधीत होणाऱ्या सामन्यांमधील थरार फुटबॉलप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून कोल्हापुरातील फुटबॉल खेळाला व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा आयोजित केली असल्याची माहिती पाटाकडील तालीम मंडळचे अध्यक्ष एस.वाय. सरनाईक, फुटबॉल संघाचे अध्यक्ष शरद माळी, फुटबॉल संघाचे कार्याध्यक्ष संपत जाधव व स्पर्धा समिती अध्यक्ष संदीप सरनाईक यांनी संयुक्तरित्या दिली.
      यावेळी बाळासाहेब निचिते, निवास जाधव, त्रिवेंद्रम नलवडे, राजेंद्र ठोंबरे, संभाजी मांगोरे-पाटील, प्रमोद बोंडगे, पराग हवालदार, दिगंबर सरनाईक, विवेक दळवी, दिलीप साळोखे, सुनील पाटील, यश सरनाईक, अश्विन गडकरी, सिध्देश हावळ, कपील हवालदार, कमलेश शिंदे उपस्थित होते. 
       दरम्यान, मंगळवारी सकाळी ८ वाजता फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ – बीजीएम स्पोर्टस् तर दुपारी २ वाजता बालगोपाल तालीम मंडळ – ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ तसेच दुपारी ४ वाजता पाटाकडील तालीम मंडळ – उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ असे सामने होतील.
      स्पर्धेच्या प्रसिध्दीसाठी शहराच्या विविध भागात वरिष्ठ गटातील आठ संघातील खेळाडूंची प्रतिमा असणारे १५×२० फुटांचे बॅनर लावणार. छत्रपती शाहू स्टेडियमच्या मुख्य रस्त्यावर दोन मोठ्या कमानी खेळाडूंच्या पोस्टरने सुशोभित करण्यात येणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी व ते खेळाकडे आकर्षित होण्यासाठी स्थानिक फुटबॉल खेळाडूंची छबी असणारे स्टीकर छापण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
                        आकर्षक बक्षिसे….. 
      सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
• विजेत्या संघास २ लाख रुपये व चषक 
• उपविजेत्या संघास १लाख रुपये व चषक 
• तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये.
      स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूस भव्य बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट हाफ, बेस्ट डिफेन्स व बेस्ट गोलकिपर यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची भेट वस्तू तसेच दररोजच्या सामन्यातील व लिग सामन्यातील मॅन ऑफ दि मॅचसाठी १५०० रुपयांची भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.
       स्पर्धेसाठी महिला प्रेक्षकांचा सहभाग वाढावा म्हणून महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था व महिलांमधून लकी ड्रॉच्या मध्यमातून रोज एक भाग्यवान विजेत्या महिलेसाठी पैठणी साडी भेटवस्तू दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे पुरुषांसाठीदेखील दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान विजेत्यांना विशेष कुपन दिले जाणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!