सामाजिक प्रश्नाची उकल करण्यासाठी संशोधन प्रकल्प प्रस्ताव लिहिणे गरजेचे

Spread the love

• सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. पंडित यांचे प्रतिपादन
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या संयोजनाखाली सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व जगप्रसिद्ध काविटेशन टेक्निकचे जनक प्रो.अनिरुद्ध पंडित ( कुलगुरू आय. सी. टी. मुंबई) यांचे देश विकासासाठी त्याबरोबरच विविध सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी संशोधन प्रस्ताव कसा लिहावा या महत्वपूर्ण विषयावर स्लाईड शोद्वारे ऑनलाईन सेमिनार उत्साहात झाला.
     कुठल्याही सरकारी योजनेसाठी प्रस्ताव लिहिणे सुरू करण्याआधी उद्देश तसेच त्याची देश विकासाबरोबरच सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी असलेली गरज समजावून घेणे महत्त्वाचे असल्याचे अनिरुद्ध पंडित यांनी सांगितले.
     संशोधकांनी या योजना प्रस्ताव लिखाण करताना एखाद्या अनुभवी संशोधकांची मदत सुरुवातीला घेतल्यास उत्तम असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आवश्यकतेनुसार उद्योगविश्व किंवा नामांकित विद्यापीठ बरोबर समझोता करार करावा, असेही सांगितले.
     संशोधन हे बहुशाखीय, सामाजिक प्रश्नाशी संबंधित, देशाच्या प्रगतीस हातभार लावणारे, नाविन्यपूर्ण कल्पनेवर आधारित असावे असेही त्यांनी विशद केले. महाविद्यालयातील शिक्षकांनी अध्यापनाबरोबरच संशोधन, उद्योगविश्वाची देवाण-घेवाण, तसेच संशोधन प्रस्ताव, निबंध लिहिण्याचे कसब उत्तम शिक्षक बनण्यासाठी गरजेचे असल्याचे अनिरुद्ध पंडित यांनी सांगितले.
केंद्र सरकारचा प्रत्येक विभाग हा अशा नावीन्यपूर्ण कल्पनेला पाठबळ देण्यासाठी उत्सुक असतो. पण योग्य प्रस्तावनाअभावी बऱ्याचवेळा हा निधी परत जातो. या संशोधन प्रस्तावाचा विषय हा पारंपारिक ज्ञानाला छेद देणाराअसला पाहिजे असेही त्यांनी शेवटी सांगितले.
     या ऑनलाईन सेमिनारच्यावेळी संशोधन प्रस्ताव करणे किती गरजेचे आहे हे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी प्रस्तावनेदरम्यान सांगितले.
     या सेमिनारच्या वक्त्यांचा परिचय महाविद्यालयाचे संशोधन अधिष्ठाता व  सेमिनार समन्वयक डॉ. अमरसिंह जाधव यांनी केला. स्वागत, सूत्रसंचालन व आभारकार्य प्रा. राधिका धनाल यांनी पार पाडले.
     या सेमिनारच्यावेळी देश तसेच देशाबाहेरील जवळपास पाचशे शिक्षक, संशोधक, पदवीधर व पदवीच्या अनेक शाखेमधील श्रोत्यांची उपस्थिती होती.
      सेमिनारसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार  ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक अनिलकुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. या सेमिनारकरिता डॉ. किरण माने, प्रा. राहुल घाडगे, डॉ. महेश शेलार, प्रा. कुंभार तसेच महाविद्यालयाच्या रिसर्च डेव्हलपमेंट विभागाने विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!