“आम्ही जगाचे कैवारी” या कादंबरीचे उद्या प्रकाशन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     लेखक विजय शहाजी पाटील यांनी लिहिलेल्या ‘आम्ही जगाचे कैवारी’ या कादंबरीचा ऑनलाईन प्रकाशन समारंभ गुरुवारी (दि.१५) सायंकाळी ४.३० वाजता वाचनकट्टा, कोल्हापूर या फेसबुक पेजवरून होणार आहे. हा समारंभ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक इंद्रजित देशमुख हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
      ‘आम्ही जगाचे कैवारी’ ही कादंबरी ग्रामीण जीवनातील संघर्ष घेऊन येते आहे. लेखक या कादंबरीतून शेतकऱ्याच्या आयुष्यातील काबाडकष्ट आणि लेकरांना भविष्य देण्याकरिता आवश्यक असलेल्या शिक्षणाचे महत्त्व विशद करतो आहे. गणपत आणि सदा या दोन जीवाभावाच्या शेतकरी मित्रांची ही कहाणी आहे.
     या समाजात काही लोकांना सर्व सुखे प्राप्त आहेत तर काही लोकांना अजूनही अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यापासून वंचितच राहावे लागत आहे. म्हणूनच या समाजाचे स्वरूप बदलायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. कारण ही सारी परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय आहे, हे यातील नायकाला पटले आहे. माझी पिढी जरी कष्टात गेली तरी पुढच्या पिढीच्या वाट्याला हे येऊ देणार नाही, या ध्येयाने प्रेरित झालेल्या नायकाची ही संघर्षकथा आहे. विजय पाटील यांनी आपल्या लेखनातून हा प्रगल्भ संदेश या ग्रामीण कादंबरीतून दिला आहे.
     तरी पुस्तकप्रेमी व विद्यार्थी यांनी वाचनकट्टा, कोल्हापूर या फेसबुक पेजवरून प्रकाशन समारंभाच्या ऑनलाईन सादरीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक व संकल्पक युवराज कदम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!