आझाद मैदानावर आंदोलनाची जय्यत तयारी

Spread the love

• महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त मुंबईत दाखल
मुंबई :
        मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यासाठी शनिवार दि. २६ फेबुवारीपासून खासदार संभाजीराजे छत्रपती आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. या आंदोलनासाठी आझाद मैदानात मंडप उभारण्यात आला असून आंदोलनाची जय्यत तयारी सुरू आहे.
       मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी युवराज छत्रपती खा. संभाजीराजेंनी आझाद मैदानात आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. राजेंच्या या निर्णयानंतर आता आंदोलनाची धग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरु लागली आहे. दि. २६ फेब्रुवारीपासुन होणाऱ्या आंदोलनाच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्ते मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. संयोजकांनी शुक्रवार सायंकाळी मैदानावरील तयारीचा आढावा घेतला.
      मराठा आरक्षणाला राजकीय मुद्दा बनवून राज्यातील प्रमुख पक्ष आरक्षण प्रश्न झुलवत ठेवत आहेत. आरक्षणाबरोबरच समाजाच्या विकासास सहाय्यक ठरणार्या मागण्या मान्य करुनही त्याची अंमलबजावणी केली जात नाही. यामुळे संतप्त झालेल्या खासदार युवराज छत्रपती संभाजीराजेंनी आता थेट आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात होणाऱ्या या उपोषणाची धग आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहचली असून राज्यातून प्रमुख कार्यकर्ते आझाद मैदानावर हजेरी लावणार आहेत.
मराठा आरक्षणाची चळवळ पुन्हा गतीमान करण्यासाठी व आक्रमकपणे आपला न्याय व हक मिळवण्यासाठी राज्यातील मराठा समाजाने भुमिका घेण्याचे ठरवले आहे.  संभाजीराजेंच्या उपोषणादिवशीच त्यांना पाठिंबा म्हणून राज्यातील अनेक शहरात आणि तालुक्याच्या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा निर्णय मराठा समाजातील समन्वयकांनी घेतला आहे.
——————————————————-     

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!