सैनिकांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील: जिल्हाधिकारी

Spread the love


• ध्वजदिन निधी संकलनाचा जिल्ह्यात शुभारंभ
कोल्हापूर • (जिमाका)
     आपल्या देशाच्या सैनिकांचे शौर्य, हिंमत, बाणेदारपणा आणि त्यागाची आपण सदैव जाणीव ठेवायला हवी. सैनिकांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वापरण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, असे आवाहन करुन सैनिकांचं लक्ष सीमेवर केंद्रीत राहण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुया, अशी साद जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घातली.
      विजय दिवस व सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रदीप ढोले, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
     यावेळी १९७१च्या युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या शूरवीर सैनिकांना अभिवादन करण्यात आले. ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात यश मिळवलेले माजी सैनिक, सैनिकांच्या पाल्यांना गौरविण्यात आले. सैनिक कल्याण (पुणे) विभागामार्फत आकाराम गणपती शिंदे (तिसऱ्या ॲथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक), कुमारी विश्रांती भगवान पाटील (ज्युनियर नॅशनल महिला कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक) संचित प्रतापसिंह जाधव (इयत्ता दहावीत १०० टक्के गुण) अनिकेत अनिल पाटील (इयत्ता बारावीत ९३.८३ टक्के गुण) यांना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विश्रांती, संचित व अनिकेत च्यावतीने त्यांच्या पालकांनी पुरस्कार स्वीकारला. वाढदिवसाचा खर्च टाळून दरवर्षी ध्वजदिन निधीमध्ये मदत करणाऱ्या चिरंजीव जीत विनोद बुबनाळे याच्यासह कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.
      भारत देशाने विजय मिळवलेल्या १९७१ च्या युद्धातील सैन्याच्या पराक्रमाच्या गाथेची माहिती देवून जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, आपल्या मायभूमीबद्दल सर्वांच्या मनात नेहमी अभिमान असायला हवा. आपल्या देशाचं नाव आणखी उज्ज्वल करण्यासाठी आपण सर्वांनी सदैव प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन करुन ते म्हणाले, आपल्या जिल्ह्यातील अनेक मुले सैन्यात दाखल झाली असून काही घरांना तर पिढ्यानपिढ्या सैन्याचा वारसा आहे. आपले कुटुंब, घर, गावापासून दूर अंतरावर राहून देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कोरोना काळातही मोठ्या प्रमाणात निधी संकलन पूर्ण होवू शकले, हे मोठं यश असून तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यामुळे हे साध्य झाले. ध्वजदिन निधी संकलनासाठी आता क्यु आर कोड देखील वापरता येत असून सर्वांनी अधिकाधिक निधी द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी केले.
     मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, देशाचे सैनिक हे  घर व कुटूंबापासून दूर राहुन आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करतात, म्हणूनच आपण निश्चितपणे राहू शकतो. सैनिक व त्यांच्या कुटुंबियांप्रति आपण नेहमी कृतज्ञ रहायला हवे.
      जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रदीप ढोले यांनी प्रास्ताविकातून १६ डिसेंबर या ‘विजय दिवस’ बाबत माहिती देवून इतिहासातील स्मृतींना उजाळा दिला.
——————————————————- Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!