घरोघरी डेंग्यूच्या रुग्ण संख्येमुळे अस्वस्थ मुश्रीफ यांनी गाठली अवचितवाडी

Spread the love


       
• गावामध्ये अधिकारी व ग्रामस्थांची घेतली आढावा बैठक
कोल्हापूर • प्रतिनिधी 
     गेले आठवडाभर अवचितवाडी (ता. कागल) येथे डेंग्यूची साथ सुरू आहे. घरोघरी केलेल्या सर्वेक्षणातून रुग्णसंख्या वाढत चालल्यामुळे अस्वस्थ झालेल्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तडक अवचितवाडी गाव गाठले. येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अधिकारी व ग्रामस्थांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत डेंग्यू साथीची सद्यस्थिती जाणून घेऊन त्यांनी घरोघरी सर्वेक्षण व तातडीच्या दर्जेदार औषधपचारांबरोबरच अनुषंगिक सेवा देण्याच्या कडक सूचना प्रशासनाला दिल्या.  
      मंत्री श्री. मुश्रीफ यानी गावातून फिरून पिण्याचा पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था या पाहणीबरोबरच सार्वजनिक स्वच्छता बघितली व ग्रामस्थांशी संवाद साधला.   
      मंत्री मुश्रीफ यांनी डेंगूसदृश्य साथीमध्ये मृत पावलेल्या चार ग्रामस्थांच्या कुटुंबियांना नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनकडून प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आर्थिक मदत देण्याचीही घोषणा केली. 
      या बैठकीत मुरगुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. डवरी यांच्याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या. रुग्णाना ॲडमिट करून घेतले जात नाही, वेळेवर उपचार केले जात नाहीत, वैद्यकीय कर्मचारी उद्धट वर्तन करतात अशा स्वरूपाच्या तक्रारी होत्या. यावर मंत्री श्री. मुश्रीफ यांनी डॉ. डवरी याना चांगलेच धारेवर धरले. कामाच्या पद्धतीत सुधारणा न झाल्यास कोणत्याही परिस्थितीत कारवाई करावीच लागेल, असा सज्जड दमही श्री. मुश्रीफ यांनी दिला.
      यावेळी मुरगूडचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, प्रवीणसिंह भोसले, तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, सरपंच उत्तम पाटील, पांडुरंग गायकवाड या प्रमुखांसह अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!