कोल्हापूर • प्रतिनिधी
अनोख्या टायटलमुळे सुरुवातीपासूनच रसिकांपासून जाणकारांपर्यंत चर्चेचा विषय ठरलेला ‘तराफा’ हा मराठी चित्रपट ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची माहिती निर्माते अविनाश कुडचे व दिग्दर्शक सुबोध पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पंकज खामकर, अश्विनी कासार, श्रावणी सोपस्कार, मिलिंद दास्ताने उपस्थित होते.
ते म्हणाले की, आजवर बऱ्याच कारणांमुळे हा चित्रपट लाइमलाईटमध्ये राहिला आहे. उत्सुकता वाढवणारं पहिलं पोस्टर , त्या मागोमाग यात नवी जोडी झळकणार असल्याची आलेली बातमी आणि सुमधूर गीत – संगीताच्या बळावर ‘तराफा’नं प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करण्याचं काम केले आहे.
निर्माते अविनाश कुडचे यांनी भूमि प्रोडक्शन या बॅनरखाली ‘तराफा’ची निर्मिती केली आहे. सुबोध पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘तराफा’ असे खूप वेगळं टायटल या चित्रपटाला का देण्यात आलंय, यात नवीन कलाकारांची जोडीच का घेण्यात आलीय, कथानकात नेमके कोणकोणते नवे पैलू सादर करण्यात आलेत, हा चित्रपट नेमका कोणत्या मुद्द्यावर भाष्य करणार आहे अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना सिनेमागृहांमध्येच मिळणार आहेत.
या चित्रपटात अश्विनी कासार आणि पंकज खामकर ही नवी कोरी जोडी आहे. अश्विनी आणि पंकज यांच्यासह चित्रपटात दिलीप डोंबे, श्रावणी सोळसकर, मिलिंद दास्ताने, प्रियंका कासले, शशांक दरणे, अरविंद धनु, शिवाजी रेडेकर, राजेंद्र जाधव, नरेंद्र जाधव, परी पिंपळे, अनिता कुलकर्णी, कविता चव्हाण, विजय जाधव, गजानन कराळे, बाबासाहेब काटे, अर्जुन खटावकर यांच्या जोडीला बालकलाकार भूमी अविनाश कुडचे, गौरी अविनाश कुडचे यांच्याही भूमिका आहेत.